वीजग्राहकांना स्वतःहून मीटर रिडींग आता 'एसएमएस'द्वारे पाठविता येणार

Update: 2021-04-30 13:16 GMT

मागील कोरोनाकाळात वाढीव वीजबिलाने त्रस्त झालेल्या ग्राहकांनामहावितरणने मोबाईल अँप व वेबसाईटद्वारे वीजग्राहकांना स्वतःहून मीटर रिडींग पाठविण्याची सोय उपलब्ध करून दिल्यानंतर आता मोबाईल 'एसएमएस'द्वारे देखील मीटर रिडींग पाठविण्याची खास सोय उपलब्ध करून दिली आहे. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात सध्या संचारबंदी सुरु आहे. तसेच अनेक भाग व सोसायट्या प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

अशा ठिकाणी महावितरणला मीटर रिडींग घेणे शक्य न झाल्यास किंवा कोरोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात आल्यानंतरही वीजग्राहकांना महावितरण मोबाईल अँप किंवा वेबसाईटद्वारे स्वतःहून मीटर रिडींग पाठविण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सोय कायम ठेवून महावितरणने आता मोबाईल 'एसएमएस'द्वारे देखील ग्राहकांना स्वतःहून मीटर रिडींग पाठविण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. ज्या ग्राहकांकडे स्मार्ट फोन नाही अशा ग्राहकांना 'एसएमएस'द्वारे मीटर रिडींग पाठविता येणार आहे. त्यासाठी ग्राहकांना दरमहा चार दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

प्रत्येक महिन्याच्या १ ते २५ तारखेपर्यंत एका निश्चित तारखेला लघुदाब वीजजोडणीच्या मीटरचे फोटो रिडींग घेण्यात येत आहे. महिन्यामध्ये रिडिंगसाठी निश्चित केलेली तारीख ग्राहकांच्या वीजबिलांवर नमूद आहे. मीटर क्रमांक देखील नमूद आहे. रिडींगच्या या निश्चित तारखेच्या एक दिवसाआधी महावितरणकडून सर्व ग्राहकांना स्वतःहून रिडींग पाठविण्याची 'एसएमएस'द्वारे दरमहा विनंती करण्यात येत आहे. हा मेसेज मिळाल्यापासून चार दिवसांपर्यंत ग्राहकांना स्वतःहून मोबाईल अॅप किंवा वेबसाईटद्वारे रिडींग पाठविता येईल. सोबतच या चार दिवसांमध्ये आता मोबाईल 'एसएमएस'द्वारे देखील मीटर रिडींग पाठविता येणार आहे.

'एसएमएस'द्वारे मीटर रिडींग पाठविण्यासाठी ग्राहकांनी स्वतःचा मोबाईल क्रमांक हा ग्राहक क्रमांकासोबत नोंदणी केलेला असणे आवश्यक आहे. या नोंदणीकृत मोबाईलवर मीटर रिडींग पाठविण्याबाबतचा मेसेज प्राप्त झाल्यानंतर चार दिवसांपर्यंत 'एसएमएस'द्वारे मीटर रिडींग पाठविणे आवश्यक आहे. वीजग्राहकांनी MREAD<स्पेस><१२ अंकी ग्राहक क्रमांक><स्पेस> असा 'एसएमएस' ९९३०३९९३०३ या मोबाईल क्रमांकावर पाठवायचा आहे. उदा. १२ अंकी ग्राहक क्रमांक १२३४५६७८९०१२ हा असल्यास व मीटरचे KWH रिडींग ८९५० असे असल्यास MREAD १२३४५६७८९०१२ ८९५० या प्रकारचा 'एसएमएस' पाठवायचा आहे. चुकीचे व मुदतीनंतर पाठविलेले मीटर रिडींग स्वीकारण्यात येणार नाही व 'एसएमएस'द्वारे मीटर रिडींग पाठविण्याची सोय केवळ कोरोना प्रादुर्भावाच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये उपलब्ध राहणार आहे.

वीजग्राहकांना स्वतःहून मीटर रिडींग पाठविण्यासाठी प्रत्येक महिन्यात केवळ दोन ते तीन मिनिटांचा कालावधी लागणार आहे. स्वतःहून रिडींग पाठविल्यास मीटरकडे व रिडिंगकडे नियमित लक्ष राहील. वीजवापरावर देखील नियंत्रण राहील. रिडींगनुसार वीजबिल आल्याची खात्री करता येईल. मीटर सदोष किंवा नादुरुस्त असल्यास त्याची तत्काळ तक्रार करता येईल. वीजबिलांबाबत कोणत्याही तक्रारी उद्भवणार नाहीत. मीटर रिडींग अचानक वाढल्यास त्याची कारणे शोधता येईल. शंका समाधानासाठी तक्रार करता येईल. या व इतर विविध फायद्यांमुळे वीजग्राहकांनी स्वतःहून दरमहा मीटर रिडींग पाठवावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Tags:    

Similar News