एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नाव ठरले

Update: 2022-06-25 08:02 GMT

शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटात आता ३८ आमदार आहेत. त्यामुळे आपणच विधिमंडळातील अधिकृत गट असल्याचे सांगत शिंदे यांनी आता शिवसेनेला आणखी एक धक्का दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्या ३८ बंडखोर गटाचे नाव आता ठरवण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जातो आहे.

एकनाथ शिंदे यांनी आता आपल्या गटाचे नाव ' शिवसेना–बाळासाहेब गट' असे ठेवले आहे. बंडखोर आमदारांपैकी एक असलेल्या दीपक केसरकर यांनी टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनेलशी फोनवरुन बोलताना सांगितले. आपल्यासोबत ३८ आमदार असल्याने आपणच गटनेते आहोत, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. एवढेच नाही तर शिंदे यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यावरही अविश्वास ठरावाची नोटीस दिली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटातील संघर्ष विधिमंडळात रंगणार आहे.

दुसरीकडे शिवसेनेनही आता बंडखोर आमदारांच्या निलंबनाची तयारी सुरू केली आहे. पण आतापर्यंत मंत्र्यांचा राजीनामा का घेतला गेला नाहीये, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. त्यामुळे येत्या काही काळात हा संघर्ष कायदेशीर पातळीवर येऊन सुटू शकतो, असे सांगितले जाते आहे.

Tags:    

Similar News