महाविकास आघाडीपेक्षा चार पट गुंतवणूक करार, उदय सामंत यांचा दावा
महाविकास आघाडी सरकारच्या काळात करण्यात आलेल्या गुंतवणूकीच्या सामंजस्य करारापेक्षा चार पट गुंतवणूक करार केल्याचा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे.
दावोस येथे सुरु असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात 1 लाख 40 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचे करार करणार असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. त्यानुसार स्वित्झर्लंडच्या दावोस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री यांनी अनेक कंपन्यांसोबत सामंजस्य करार केले. त्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माध्यमांना दिली.
उद्योगमंत्री उदय सामंत यावेळी म्हणाले की, दावोस परिषदेला जाण्यापुर्वी जर्मनीतील कंपन्यांशी 300 कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले. त्याबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोसमध्ये महाराष्ट्र पॅव्हेलियनचे उद्घाटन केले. हे पॅव्हेलियन सर्वात सुसज्ज असे होते. त्याबरोबर या परिषदेच्या माध्यमातून 1 लाख 40 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात यश मिळाले.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, या करारांच्या माध्यमातून राज्यात 1 लाख रोजगार निर्माण होणार आहेत. त्यात रायगड येथे बल्कशायर हाथवे या अमेरिकन कंपनीने डाटा सेंटरची उभारणी करण्यासाठी 16 हजार कोटी रुपयांचा गुंतवणूक करार केला आहे. त्याच्या माध्यमातून 15 हजार रोजगाराची निर्मीती होणार आहे.
गोगोरो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या इलेक्ट्रिकल व्हेईकल बनवणाऱ्या कंपनीने 20 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूकीसाठी करार केला आहे. ही कंपनी भारतात EV बॅटरी, EV टू व्हिलर आणि 5 हजार चार्जिंग स्टेशन उभे करणार आहे. या कंपनीच्या माध्यमातून महाराष्ट्रात 30 हजार नोकऱ्यांची निर्मीती होणार आहे.
ICB इन्व्हेस्टमेंट इंडस कॅपिटल ही कंपनी महाराष्ट्रात मेडिकल टेक्नॉलॉजी पार्कची उभारणी करणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रात 16 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. त्याबरोबरच या कंपनीच्या माध्यमातून 15 हजार तरुणांना रोजगार मिळणार असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. ग्रीनको एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून 12 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. त्यातून राज्यातील 6 हजार 300 तरुणांना रोजगार मिळणार आहे.
महिंद्रा इलेक्ट्रिकल EV कारची निर्मीती करणार आहे. त्यासाठी 10 हजार कोटींची करणार गुंतवणूक करण्यात येणार आहे. त्याबरोबरच 6 हजार कोटी नाशिक आणि पुण्यातील प्रकल्पांमध्ये करणार आहे. त्यामुळे या कंपनीच्या माध्यमातून एकूण 8 हजार तरुणांना मिळणार रोजगार मिळणार आहे. न्यू एरा ग्रीनटेक गॅसिफिकेशन प्रकल्प विदर्भात करण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला. या माध्यमातून 20 हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. तसेच 15 हजार नोकऱ्यांची नोकऱ्यांची निर्मीती होणार आहे.
निबॉन टेलिग्राम कंपनी मुंबई, पुणे, नागपूरमध्ये डाटा सेंटरची उभारणी करणार आहे. त्यासाठी ही कंपनी 20 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. त्यातून राज्यात 1 हजार 525 नोकऱ्यांची निर्मीती होणार आहे.
लक्संबर इन्व्हेस्टमेंट ही कंपनी डाटा सेंटरमध्ये 12 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रात 1 हजार 200 नोकऱ्यांची निर्मीती होणार आहे.
अमेरिकेतील इलेक्ट्रिकल व्हेईकल बनवणाऱ्या कंपनीलाही करणार विनंती असल्याचेही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. तसेच बंदरविकासाचे प्रकल्प उभे करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेतला आहे. त्याबरोबरच कौशल्य विकास करण्यासाठी बर्कले विद्यापीठासोबत सामंजस्य करार केल्याचेही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये शहर विकास आणि नवी अर्थव्यवस्थेबाबत सामंजस्य करार करण्यात आले आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काँग्रेसमधील भाषण महाराष्ट्राच्या उद्योगाला दिशा देणारे भाषण असल्याचेही उद्योगमंत्री सामंत म्हणाले.
पुढे बोलताना सामंत म्हणाले की, आम्ही फक्त MOU करून थांबणार नाही तर अंमलबजावणीही करणार आहोत. तसेच गेल्या सरकारने केलेल्या करारातील गुंतवणूक झालीच नाही. त्यामुळे आगामी काळात सौर उर्जा प्रकल्प उस्मानाबादमध्ये उभा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे उद्योगमंत्री सामंत म्हणाले. गेल्या सरकारपेक्षा दुप्पट नाही तर चौपट सामंजस्य करार करण्यात यश मिळाल्याचेही उद्योगमंत्री सामंत म्हणाले.