विहंग सरनाईक ईडीच्या ताब्यात
परदेशात असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर सकाळपासून छापेमारी केल्यानंतर ईडीच्या टीमने सरनाईक यांचे चिरंजीव विहंग सरनाईक यांना सक्तवसुली संचलनालय (ईडी)नं ताब्यात घेतलं आहे.
सकाळपासून धाडसत्र सुरु केल्यानंतर ईडीनं विहंग सरनाईक यांना अटक केली आहे. त्यांना कुठे घेऊन जात आहेत, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. मात्र, सरनाईक यांच्या इतर ठिकाणांवर छापा टाकण्यासाठी किंवा अधिक चौकशीसाठी ईडी कार्यालयात नेण्यासाठी विहंग सरनाईक यांना ईडीने ताब्यात घेतल्याचं समजत आहे.
मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी आज सकाळी ईडीने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर छापे मारले. सरनाईक यांच्या घर, कार्यालय आणि दहा ठिकाणांवर हे छापे मारण्यात आले. सरनाईक यांचे चिरंजीव विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावरही छापे मारण्यात आले. तब्बल चार तासांच्या चौकशीनंतर ईडीने अखेर विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतलं. त्यांना अधिक चौकशीसाठी ईडी कार्यालयात नेत आहे.