माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबई, नागपुरातील घरांवर ईडीचे छापे
परमबीर सिंग यांच्या आऱोपांनंतर गृहमंत्रीपदाचा राजीनामा देणाऱ्या अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. ईडीने अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूरमधील घरांवर छापा टाकला आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरी आणि त्यांच्या काही निकटवर्तीय लोकांच्याही घरी ईडीने छापे टाकल्याचे सांगितले जात आहे.
सकाळी 8 वाजताच्या सुमारास ईडीच्या अधिकाऱ्यांच्या दोन गाड्या देशमुख यांच्या बंगल्यावर दाखल झाल्या. 7 ते 8 अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. देशमुख यांच्या घराबाहेर सीआरपीफच्या जवानांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एकीकडे नागपूरच्या छाप्यांचे वृत्त आल्यानंतर काही वेळातच देशमुख यांच्या मुंबईतील वरळी इथल्या घरीही ईडीचे पथक पोहोचले आणि त्यांनी कारवाईला सुरूवात केली.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर त्यांच्यावर मनी लॉन्डरिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्याआधी सीबीआयनेही देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतील बार आणि हॉटेल चालकांकडून 100 कोटी रुपये गोळा करुन आणण्याचे आदेश देशमुख यांनी सचिन वाझेला दिले होते, तसेच पोलिसांच्या बदल्यांमध्येही देशमुख यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप परबमीर सिंग यांनी केला होता. त्यानंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.