राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची ईडीकडून तब्बल ९ तास चौकशी

Update: 2021-12-08 02:30 GMT

अहमदनगर// अहमदनगर जिल्ह्यातील राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची ईडीकडून काल रात्री १० च्या सुमारास तब्बल ९ तास चौकशी करण्यात आली. राज्य सहकारी बँकेतील साखर कारखान्यांच्या घोटाळा प्रकरणाबाबत राज्यमंत्री तनपुरे यांची चौकशी करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत सुमारे २५ हजार कोटी रूपयांचा घोटाळा झाला आहे. याबाबत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर हा गुन्हा ईडीकडे तपासासाठी देण्यात आला आहे. राज्य सहकारी बँकेने अनेक कारखान्यांना कर्ज दिलं आहे.हे कर्ज अनेक सरकारी कारखान्यांनी फेडलेले नाही. त्यामुळे बँकेने ते कारखाने जप्त केले. हे जप्त केलेले कारखाने बँकेवर संचालक असलेल्या लोकांच्या नातेवाईकांनीच कवडीमोल किंमतीत विकत घेतले. हा सर्व प्रकार सहकारी साखर कारखाना घोटाळा म्हणून ओळखला जातो. राज्यमंत्री तनपुरे यांनी देखील एक कारखाना विकत घेतला आहे.

म्हणून राज्यमंत्री तनपुरेंची चौकशी

ईडीने काही दिवसांपूर्वी नऊ ठिकाणी धाडी टाकल्या. या धाडी मुंबई , पुणे , नागपूर आणि नगर येथे टाकल्या होत्या. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित व्यक्ती, त्याचप्रमाणे राम गणेश गडकरी साखर कारखान्याशी संबंधित ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. त्यावेळी अनेक महत्वाचे कागदपत्रं ईडीच्या हाती लागली आहे. याबाबत ईडीच्या अधिकाऱ्यांकडून तनपुरे यांची चौकशी झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान चौकशीला मी सविस्तर उत्तर दिलेली आहेत. जे प्रश्न विचारण्यात आले त्यांची मी त्यांना उत्तर दिली आहे. जे आक्षेप नोंदवले जात आहेत त्यात काहीही तथ्य नाही मला पुन्हा बोलावल्यास मी ईडीच्या अधिकाऱ्यांना माहिती देईन, असे राज्यमंत्री तनपुरे यांनी सांगितले.

१३ कोटी रुपयांना विकत घेतला कारखाना

राज्यमंत्री तनपुरे हे नगर जिल्ह्यातील राहुरी मतदार संघाचे आमदार असून त्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने जप्त केलेला कारखाना विकत घेतला आहे. २०१२ मध्ये या कारखान्याचा लिलाव जाहीर करण्यात आला. हा लिलाव जाहीर झाला तेव्हा तनपुरे यांचे वडील माजी खासदार प्रसाद तनपुरे हे बँकेच्या संचालक मंडळावर होते. कारखान्याचा लिलाव जाहीर झाला तेव्हा कारखान्याची विक्री किंमत २६ कोटी जाहीर करण्यात आली होती. मात्र, तनपुरे यांच्या प्रसाद शुगर अँड अलाईड या कंपनीने तो केवळ १३ कोटी रुपयांना विकत घेतला. हाच व्यवहार ईडीला संशयास्पद वाटत आहे. त्या अनुषंगाने तनपुरे यांची चौकशी करण्यात आली.

Tags:    

Similar News