न्य़ा. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करणाऱ्या सतीश उके यांना EDने अटक केली आहे. कोठडी संपल्याने त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. आता त्यांना कोर्टाने २६ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीमध्ये सतीश उके यांच्यातर्फे वकील रवी जाधव यांनी युक्तीवाद केला. यामध्ये उके यांच्या वकिलांनी गंभीर आरोप केला आहे. न्या. लोया यांचे एक महत्त्वाचे पत्र EDने सतीश उके यांच्या घरी टाकलेल्या धाडीमध्ये जप्त केले आहे, त्य़ा पत्राची प्रत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच नागपूरमध्ये ईडीचे विशेष कोर्ट असूनही दोन्ही उके बंधूंना मुंबईत का आणण्यात आले असा सवालही उपस्थित करण्यात आला. यावर कोर्टाने ईडीच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली आहे. पुढील सुनावणीमध्ये यावर चर्चा होणार आहे.
यावेळी सतीश उके यांच्या वकिलांनी न्यायमूर्ती लोया यांचे अखेरचे पत्र असल्याचा दावा करत त्यातील काही माहिती पत्रकारांना वाचून दाखवली. यामध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्यावर दबाव टाकत असल्याचा आरोप लोया यांनी केला होता, असा दावा रवी जाधव यांनी केला. तसेच आपल्यावर पाळत ठेवली जात असून आपण खूप दबावात आहोत, असेही न्या. लोया यांनी लिहिले होते, असाही आरोप त्यांनी केला.