ईडीच्या नागपूर आणि मुंबईत १५ ठिकाणी धाडी, कोट्यावधीचे दागिने आणि रोकड जप्त...
सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच ईडी ने महाराष्ट्रातील मुंबई आणि नागपूमधील जवळपास १५ ठिकाणी मोठ्या प्रमाणावर छापे टाकले आहेत. या छाप्यामध्ये ईडीने जवळपास कोट्यावधी रुपयांची रोकड हस्तगत केली असून लाखो रुपयांचे दागिने सुद्धा हस्तगत केले आहेत. अशी माहिती मॅक्स महाराष्ट्राच्या हाती लागली आहे. ईडीच्या या कारवाईमुळे मुंबई आणि नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
नागपूर (Nagpur) येथील पंकज मेहाडिया, लोकेश आणि कथिक जैन यांच्या गुंतवणुकीच्या फसवणुकीसंदर्भात ईडीने (Enforcement Directorate) नागपूर आणि मुंबईतील १५ ठिकाणी शोध मोहीम हाती घेत कोट्यावधीची रोकड जप्त केली आहे. त्याचप्रमाणे लाखो रुपयांचे दागिने सुद्धा जप्त केले आहेत. या छाप्यादरम्यान ५.५१ कोटी रुपयांचे बेहिशेबी दागिने आणि १.२१ कोटी रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. ही रोकड आणि इतक्या मोठ्याप्रमाणात दागिने कुठून आले यांचा ईडीकडून तपास सुरु असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
नागपूरमधील अनेक स्टील, लोह आणि रिअल इस्टेट व्यावसायिकांवर ईडीने हे छापे मारले आहेत. हे व्यापारी अनेक दिवसांपासून ईडीच्या रडारवर होते. मुंबईसह (Mumbai) नागपूरमध्ये मिळून १५ ठिकाणी हे छापे ईडीने मारले. या व्यावसायिकांच्या घरांवर आणि कार्यालयावर टाकलेल्या छाप्यामध्ये अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या सर्व कागदपत्राचा तपास सध्या ईडीचे अधिकारी करत आहेत. याशिवाय अनेकांची फसवणूक करणाऱ्या पंकज मेहाडियाच्या घरावरही छापा टाकण्यात आल्याची माहिती मॅक्स महाराष्ट्रच्या टिमली मिळाली आहे.
व्याजाचे आमिष दाखवून पंकज मेहाडिया नागपूरमधील नागरिकांची लुबाडणूक करत असे. त्याची नागपूरमधील एक ठग म्हणून ओळख होती. मेहाडिया यांच्यासह त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हे शाखेच्या आर्थिक शाखेना फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. २०११ मध्ये यांना अटकही करण्यात आली होती. यानंतर आज ईडीने त्यांच्या घरावर छापा टाकला.