कोरोना काळात आरोग्य विभाग कुठलीही भीती न बाळगता कार्यरत राहिला- तटकरे
कोरोना महामारीत आमचा एक विभाग कुठलीही भीती न बाळगता कार्यरत राहिला तो म्हणजे आरोग्य विभाग असे वक्तव्य पालकमंत्री अदिती तटकरे यांनी केले.;
म्हसळा : कोरोना महामारीत आमचा एक विभाग कुठलीही भीती न बाळगता कार्यरत राहिला तो म्हणजे आरोग्य विभाग असे वक्तव्य पालकमंत्री अदिती तटकरे यांनी केले. त्यांनी म्हसळा येथे आरोग्य विभागाचे कौतुक केले.
आरोग्य कर्मचारी व आशा यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी पार पाडत स्वत:च्या कुटुंबाची व स्वत:च्या आरोग्याची भीती न बाळगता घरोघरी जाऊन योजना प्रभावीपणे राबवली. जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली,एकीकडे कोरोनारुग्ण सांभाळणे तर दुसरीकडे लसीकरणाची मोहीम यशस्वीपणे हाती घेणे, यामुळे आरोग्य विभागाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. अशी भावना पालकमंत्री अदिती तटकरे यांनी या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.
म्हसळा पंचायत समिती हॉलमध्ये सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांच्या सहीच्या प्रशस्ती पत्राचे कोरोना काळात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
म्हसळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर प्रियांका देशमुख,डॉक्टर नेहा पाटील, खामगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर प्राजक्ता पोटे,मेंदडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर विशाल भावसार,डॉक्टर पूजा डोंगरे,डॉक्टर चारुशीला गायकवाड यांनी आपापल्या कर्मचाऱ्यांच्या वतीने प्रशस्तीपत्र स्विकारले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉक्टर नेहा पाटील यांनी केले यावेळी तालुका आरोग्य अधिकारी प्रशांत गायकवाड यांनी यशस्वीपणे कार्यक्रमाचे आयोजन केल्याने त्यांचे कौतुक करण्यात आले.