..म्हणून बंदूकीची गोळी झाडून सुनेनेच काढला सासूचा काटा..!
सासूकडून सुनेचा छळ होत असल्याच्या अनेक घटना घडत असतात. मात्र यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी गावातील सुनेने थेट बंदुकीच्या गोळीने सासूचा खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी गावातील मुबारकनगर भागात आशा किसन पोराजवार (वय 60) या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्यामुळे मुलाने आशा पोराजवार यांना आर्णीतील दवाखान्यात नेले. तर तेथे दाखल केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. दरम्यान शवविच्छेदन करताना महिलेच्या डोक्यात बंदूकीची गोळी आढळून आली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी आरोपीच्या घरातून पोलिसांनी दोन निकामी काडतूस आणि पाच जीवंत काडतूस जप्त केले. मात्र त्यानंतरही आरोपी नेमकं कोण याचे कोडे सुटले नव्हते. त्यामुळे पोलिसांनी अधिक तपास केला असता आशा पोराजकर यांच्यावर झाडण्यात आलेली गोळी प्रभू गव्हाणकर या सेवानिवृत्त सैनिक प्रभू गव्हाणकर यांच्या चोरी गेलेल्या रिव्हॉल्वरमधील असल्याचे उघड झाले.
त्यानंतर पोलिसांनी विविध लोकांचे जबाब नोंदवले. त्यामध्ये सासू सुनेमध्ये कायम वाद सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सुनेची चौकशी केली. त्यामध्ये सुनेनेच सासूचा खून केल्याची धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आली.
सकाळी साडेआठ ते पावणे नऊच्या दरम्यान मी घराबाहेर भाजीची गाडी लावतो. त्यावेळी अचानक घरातून चीसी फुटल्यासारखा आवाज आला. त्यानंतर मी बायकोला आवाज दिला. मात्र आतून कोणाचाही आवाज आला नाही. मात्र तेवढ्यात माझा मुलगा घरातून धावत आला आणि मला घरात चला म्हणाला. मी आई रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहिल्यानंतर आजू बाजूच्या लोकांना आवाज दिला आणि तात्काळ आर्णी येथील रुग्णालयात दाखल केले, असे आरोपी महिलेचा पती अरविंद पोराजवार यांनी सांगितले. तर पोलिसांनी सुनेला ताब्यात घेतले आहे.
यावेळी दारव्हा उपविभागीय पोलिस अधिकारी आदित्य मिलखेकेकर यांनी सांगितले की, 21 जानेवारी रोजी सेवानिवृत्त सैनिक प्रभु गव्हाणकर यांच्या घरातून रिव्हॉल्वरची चोरी झाली होती. त्यानंतर तीनच दिवसांनी मुबारकनगर भागातील प्रभू गव्हाणकर यांच्या घरासमोरील महिलेचा मृत्यू झाल्याची बातमी समजली. तर शवविच्छेदन अहवालात महिलेच्या डोक्यात बंदूकीची गोळी आढळून आली. त्यावरून पोलिसांना ही बंदूक प्रभू गव्हाणकर यांच्या घरातून चोरी गेलेलीच असू शकते, अशी शक्यता वाटली. त्यावरून पोलिसांनी त्या दिशेने तपास केला. त्यामध्ये सासू सुनेच्या वादातून सुनेनेच गोळी झाडून सासूची हत्या केल्याची माहिती समोर आली.