गुलाब चक्रीवादळामुळे राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोमवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. तसेच वादळी वाऱ्यांमुळे औरंगाबाद शहरात तर अनेक मोठमोठी झाडे उन्मळूबन पडली आहेत. मुंबई देखील मंगळवारी दुपारपासून जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. त्याचसोबत ठाणे आणि नवी मुंबईमध्ये देखील जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. दरम्यान राज्यात सर्वाधिक पाऊस हा अकोला, वाशीम या जिल्ह्यात होईल असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे.
बुलडाणा जिल्ह्यातही सोमवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात एक बस पाण्यात वाहून गेल्याने एकाच प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर ३ प्रवासी बेपत्ता आहेत, उर्वरित दोन प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. नाशिक जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. मराठवाड्यातही सोमवारपासून जोरदार पाऊस असल्याने अनेक नद्यांना पूर आला आहे. ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प देखील पूर्णपणे भरल्याने या प्रकल्पाचे ११ दरवाजे उघडण्यात आले आहेत. या प्रकल्पातून १८७९१ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यात धर्माबाद, कंधार, अर्धापूर या तालुक्यासह जिल्ह्यात ३५ मंडळात शंभर मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. आसना नदीला आलेल्या पुरामुळे अर्धापुर तालुक्यातील अनेक शेतीतील पीक पाण्याखाली गेलं आहे. शेलगावजवळील उमा नदीला पूर आल्याने गावाचा संपर्क काही तास तुटला आहे. यामुळे मुदखेडकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय.