मुंबई : नववर्षाच्या पार्टीसाठी मुंबईत आणलेल्या सुमारे 3 कोटी 18 लाख रुपयांचा ड्रग्सचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तीन आफ्रिकन नागरिकांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. क्राईम ब्रांचचे जॉईंट सिपी मिलिंद भारंबे आणि अंमली पदार्थ विभागाचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे.
बिकेसी भागात एक आफ्रिकन नागरिक संशयास्पदरित्या फिरत असल्याचे अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या अधिकाऱ्यांना दिसला, दरम्यान त्याला ताब्यात घेत त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 105 कोकेन तर 120 ग्राम मोफेड्रिन ड्रग्स सापडले. इबे माईक असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने त्याच्या अन्य दोन साथीदारांची नावं सांगितली. हे ड्रग्स त्याला त्याच्या दोन आफ्रिकन साथीदारांनी विकल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
मुंबईमध्ये प्रवेश करण्यासाठी महत्वाचा नाका असलेल्या वाशी नाका येथे पोलिसांनी धाव घेत आणखी दोन आफ्रिकन नागरिकांना ताब्यात घेतलं. ओडिफे आणि मंडे अशी त्यांची नावे आहेत. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडेही मोठा ड्रग्ज साठा सापडला आहे. या तिघांकडे मिळून कोकेन 225 ग्रॅम, मेफेड्रीन 1500 ग्रॅम आणि एमडीएमए 235 ग्रॅम सापडले आहे. या सर्व ड्रग्सची किंमत 3 कोटी 18 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. अंमली पदार्थ विरोधी विभागाची ही एक मोठी कारवाई आहे.