डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या
आमटे कुटुंबीयांमध्ये गेले काही दिवस सुरू असलेला वाद अखेर डॉ.शीतल आमटे यांच्या आत्महत्येने क्षमला आहे..;
आनंदवन येथील महारोगी सेवा समिती सीईओ डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना येथे घडली आहे. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. स्वतःला विषारी इंजेक्शन टोचून घेतल्याची प्राथमिक माहिती वैद्यकीय अधिकारी सूत्राने दिली. मृत्यूचे नेमके कारण अद्याप पुढे आले नाही.
शीतल आमटे यांनी काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमावर एक चित्रफीत जारी केली होती. त्यात आनंदवनातील कार्यकर्ते तसेच आमटे कुटुंबातील सदस्यांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. ही चित्रफीत नंतर दोन तासांतच माध्यमातून हटवण्यात आली होती. त्यात करण्यात आलेल्या आरोपांशी अजिबात सहमत नसल्याचे व ते तथ्यहीन असल्याचे निवेदन आमटे कुटुंबातर्फे जारी करण्यात आले होते. डॉ. विकास, डॉ. प्रकाश, डॉ. भारती व डॉ. मंदाकिनी आमटे यांची स्वाक्षरी असलेल्या या निवेदनात डॉ. शीतल (पूर्वाश्रमीच्या डॉ. शीतल विकास आमटे) या सध्या मानसिक ताण व नैराश्याचा सामना करीत असल्याची स्पष्ट कबुली देण्यात आली होती. शीतल यांनी समाजमाध्यमावर जारी केलेल्या चित्रफितीतसुद्धा तशी कबुली दिल्याचे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले होते.