ukraine Russia Crisis : विशेष विमान भारतीयांना आणण्यासाठी युक्रेनला रवाना...
रशिया आणि युक्रेन मध्ये निर्माण झालेल्या तणाव निवळण्याची चिन्हं दिसत नसताना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक पार पडली. भारताने या बैठकीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. युक्रेन व आसपासच्या परिसरामध्ये राहत असलेल्या २० हजारांपेक्षा जास्त भारतीयांना सुरक्षित भारतात परत आणणे भारताची प्राथमिकता आहे, अशी भूमिका भारताने यावेळी मांडली आहे.
यूक्रेन व आसपासच्या परिसरात असलेल्या भारतीयांना सुरक्षित भारतात परत आणण्याची वाटचाल सुरू झाली आहे. आज सकाळी एअर इंडियाचं एक विशेष विमान युक्रेनला रवाना झालं आहे. 200 हून अधिक सिट्स असलेलं ड्रीमलायनर बी-787 विशेष विमान भारतातून पाठवण्यात आलं आहे. भारतासोबत युक्रेनने देखील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
आम्हाला शांतता हवी आहे, युक्रेन कोणत्याही चिथावणीपुढे झुकणार नाही, अशी भूमिका देखील त्यांनी स्पष्ट केली. रशियाची तयारी... काही हाय रिझोल्युशन सॅटॅलाइट फोटोद्वारे, युक्रेनच्या सीमेलगत रशियन फौजा हल्ल्यासाठी सज्ज असल्याचं दिसून येतं. सीमेलगत जवळपास दीड लाखांपेक्षाही जास्त सैन्य तैनात असून लढाऊ विमान, शस्त्र साठा देखील मोठ्या प्रमाणात असल्याचं दिसून येतं. मात्र, रशियाने हल्ला केल्यास त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा अमेरिका आणि युरोपीय देशांनी रशियाला दिला आहे.