'...अन्यथा यूकेसारखीच गंभीर परिस्थिती आपल्याकडेही होईल'- डॉ. रणदीप गुलेरिया
दिल्ली एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी ओमिक्रॉन बाबत बोलताना चिंता व्यक्त केली आहे.त्यांनी म्हटले की, आपण तयारी केली पाहिजे आणि यूकेसारखी वाईट परिस्थिती आपल्याकडे होऊ नये, अशी आशा आहे
नवी दिल्ली // देशात कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट 'ओमिक्रॉन' झपाट्याने पसरत आहे. रविवारी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये नवीन रुग्ण आढळल्यानंतर देशात ओमिक्रॉनची रुग्ण संख्या 151 वर पोहोचली आहे. दरम्यान, दिल्ली एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी ओमिक्रॉन बाबत बोलताना म्हटले की, आपण तयारी केली पाहिजे आणि यूकेसारखी वाईट परिस्थिती आपल्याकडे होऊ नये, अशी आशा आहे. यूकेत एका दिवसात ओमिक्रॉनच्या 10,000 हून अधिक रुग्ण आढळले आहे.
यूकेत मागील 24 तासांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची 90,000 हून अधिक समोर आली आहेत. सोबतच डॉ. गुलेरिया म्हणाले की, "आम्हाला आणखी डेटा हवा आहे. जेव्हा जगाच्या इतर भागात संसर्गाची प्रकरणे वाढतात तेव्हा आपण बारकाईने निरीक्षण केले पाहिजे आणि त्यानुसार तयारी केली पाहिजे."
मागील महिन्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट समोर आल्यानंतर, ते म्हणाले की ओमिक्रॉनच्या स्पाइक प्रोटीन क्षेत्रात 30 हून अधिक म्यूटेशन आढळले आहे. हे या व्हेरिएंटला रोगप्रतिकारक शक्ती तंत्रापासून वाचण्याची क्षमता विकसित करण्यात मदत करू शकतं आणि त्यामुळे त्याविरूद्ध लसीच्या प्रभावाचे मूल्यांकन करणं आवश्यक आहे.
शनिवारी ब्रिटिश हेल्थ प्रोटेक्शन एजन्सीने ओमिक्रॉनचे 10,059 नवीन रुग्ण आढळल्याचे सांगितले होते. ही रुग्णसंख्या शुक्रवारी नोंदवलेल्या 3,201 प्रकरणांच्या संख्येपेक्षा तिप्पट आहे. यासोबतच यूकेत आतापर्यंत ओमिक्रॉनच्या एकूण 24,968 प्रकरणांची नोंद झाली आहे
Omicron प्रकाराबाबत, WHO ने शनिवारी सार्वजनिक आरोग्य सुविधा आणि सामाजिक उपाययोजना तातडीने वाढविण्यावर भर दिला. डब्ल्यूएचओच्या दक्षिण-पूर्व आशिया क्षेत्राच्या प्रादेशिक संचालक पूनम खेत्रपाल सिंग यांनी सांगितलं की, देश ठोस आरोग्य आणि सामाजिक उपायांनी ओमिक्रॉनचा प्रसार रोखू शकतात.