मुंबई ते साकीनाका परिसरातील निर्भया घटना ही अतिशय संवेदनशील व निंदनीय असली तरी या घटनेवरून आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काल घटनेचा निषेध करत असताना भारतीय जनता पक्षाच्या वतीने चित्रा वाघ व विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी राजावाडी रुग्णालयांमध्ये भेट घेतली,याच वेळी भीम आर्मीच्या वतीने आघाडी सरकार तसेच भारतीय जनता पक्षाच्या विरोधात घोषणाबाजी करत या घटनेचे राजकारण करू नका असं सांगण्यात आलं आहे.
भीम आर्मीची घोषणाबाजी ऐकून विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी ही मंडळी मयताच्या टाळूवरचे लोणी खाण्यासाठी आली आहे असे वक्तव्य केलं, असं सांगत भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी दरेकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
याचवेळी त्यांनी प्रवीण दरेकर यांना थेट इशारा दिला आहे की तुमचे वक्तव्य चुकीचे असून तुम्ही जिथे कुठे भेटाल तेथे भीम आर्मी तुम्हाला दणका दाखवल्याशिवाय राहणार नाही.देशात भाजपचे सरकार आहे अशावेळी केरळ, महाराष्ट्र आणि इतरही राज्यात अशा दुर्दैवी घटना घडत आहेत त्यावर भाजप काय करत आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सोबतच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पीडीतेच्या घरी भेट का दिली नाही असा देखील सवाल भीम आर्मीने विचारला आहे, मातोश्रीवर कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश केला जातो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मुलाचे पेंग्विन प्रकरण होते तेंव्हा मुख्यमंत्री भायखळा येथे धाव घेतात, मात्र या पीडितेच्या घरी भेट द्यायला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वेळ नाही हे दुर्दैवी आहे असं भीम आर्मीने म्हटले आहे.