आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव करणाऱ्या ज्ञानदेव रांजणेंचा चंद्रकांत पाटलांनी केला सत्कार
सातारा// सातारा जिल्हा बँक निवडणुकीमध्ये जावळी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर ज्ञानदेव रांजणे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव केल्यानंतर नवीन राजकीय ट्विस्ट निर्माण झाल्याचे दिसत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ज्ञानदेव रांजणे यांची अचानक भेट घेऊन त्यांचा सत्कार केला आहे. त्यामुळे राजकिय चर्चांना उधाण आले आहे. ज्ञानदेव रांजणे यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांचा एका मताने पराभव केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज ज्ञानदेव रांजणे यांचं जावळी तालुक्यातील आंबेघर येथील घरी जाऊन अभिनंदन केलं.
दरम्यान यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'संघर्षातून ज्याने विजय मिळवला आहे, कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भिडपणे निवडणूक लढवून विजयी झाले आहेत; अशा कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवणं व त्याचं कौतुक करणं गरजेचं असतं. म्हणून मी जावळी तालुक्यात ज्ञानदेव रांजणे यांचं अभिनंदन करण्यासाठी आलो आहे'. या राजकीय घटनेमुळे जावळी तालुक्यात नवा राजकीय ट्विस्ट निर्माण झाला आहे.
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये एकाच पॅनेलमध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह शशिकांत शिंदे देखील होते. शशिकांत शिंदे यांच्या पराभवनंतर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी जावळीत येऊन ज्ञानदेव रांजणे यांचा जाहीर सत्कार केला होता. राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी बंडखोरी करत भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मदतीने राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव केल्याने राज्यात चांगलीच चर्चा झाली होती. याची दखल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना अजित पवार यांनी देखील घेतली.