कोरोनाच्या तिस-या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज- मुश्रीफ

कोरोनाच्या तिस-या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे, मात्र जिल्ह्यातील नागरिकांनीही प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास, कामगार मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

Update: 2021-08-15 09:10 GMT

अहमदनगर : कोरोनाच्या तिस-या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे, मात्र जिल्ह्यातील नागरिकांनीही प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास, कामगार मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीसाठी आले असता ते बोलत होते.

या कोरोना संकटाच्या काळातही जिल्ह्यातील विकास कामांच्या अंमलबजावणीचे प्रयत्न सुरु असून त्यासाठी राज्यस्तरावरुनही अधिकाधिक निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचीही त्यांनी सांगितले.

सध्या आपल्यासमोर कोरोनाचे मोठे आव्हान असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले की, कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्य शासन, जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संघटना योगदान देत आहेत. कोरोनाच्या पहिल्या दोन लाटांचा आपण सामना केला. आता तिस-या लाटेचे संकट समोर आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळली पाहिजे, घराबाहेर पडताना मास्कचा वापर करायला हवा, लक्षणे जाणवल्यास तात्काळ उपचार घ्यावा या उपाययोजनांच्या माध्यमातून आणि प्रत्येकाने योग्य ती काळजी घेत स्वताचे आरोग्य जपावे, असे आवाहन त्यांनी केले.

सोबतच राज्यातील शेतक-यांना स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी बनवण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. विकेल ते पिकेल या संकल्पनेनुसार शेतमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी रयत बाजार सुरु करण्यात येणार आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमा अंतर्गत जिल्ह्यासाठी ११ कोटी २९ लाख रुपये प्राप्त झाले असून, राष्ट्रीय कृषी विकास योजनेत कांदाचाळ उभारणी, शेततळे अस्तरीकरण, नियंत्रित शेती यातील लाभार्थींना अनुदानाचे वितरण आपण केले आहे. असं पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात जवळपास पावणेतीन लाख शेतक-यांना २२०२ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. राष्ट्रीयकृत बॅंकांनी कर्जवाटपाचा वेग अधिक वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले.

Tags:    

Similar News