कल्याणमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकावरून शिवसेना - भाजपात श्रेयवाद
कल्याण : कल्याणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवाद सुरू झाला आहे. अभ्यासपूर्ण पाठपुरावा करुन स्मारकासाठी आवश्यक असलेली जागा उपलब्ध करुन दिली. तसेच पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यापुढे स्मारकामासाठी आणखीन निधी लागल्यास तोही दिली जाईल असा दावा शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना केला आहे. तर या स्मारकासाठी राज्य सरकारकडून जी काही परवानगी हवी होती. ती मी आणून दिली. सातत्याने पाठपुरावा केला आहे. आत्ता फक्त निवडणूकाजवळ आल्याने दलित बांधवांना खूश करण्यासाठी शिवसेनचा हा कट असल्याचा आरोप भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे. स्मारकाचे श्रेय घेण्याऐवजी समृद्धी महामार्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे अशी मागणी आमदार गायकवाड यांनी केली आहे.
कल्याण पूर्व भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक व्हावे अशी अनेक दिवसांपासूनची मागणी होती. महापालिकेच्या ड प्रभाग समितीच्या नजीक असलेल्या उद्दानाची 8000 चौरस मीटर जागा आहे. त्याच जागेत 1300 चौरस मीटर जागेत डॉ. आंबेडकरांचे स्मारक उभे करण्याची मागणी होती. मात्र या जागेवर आरक्षण असल्याने स्मारक उभे कसे राहणार? असा प्रश्न होता. हे आरक्षण बदलण्यात आले असून त्यासाठी पाच कोटीचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. स्मारकाच्या कामाचा डीपीआर तयार करुन लवकर निविदा काढली जाईल. स्मारकाचे काम लवकर सुरु केले जाईल. आरक्षण बदल आणि निधीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सहकार्यामुळेच हे स्मारक उभे राहत असल्याचे खासदार शिंदे यांनी म्हटले आहे. आज स्मारक समितीच्या वतीने स्मारकाच्या जागेच्या ठिकाणी शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी महेश गायकवाड, रमेश जाधव, प्रशांत काळे, हर्षवर्धन पालांडे रिपाईचे ज्येष्ठ नेते अण्णा रोकडे भारत सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
तर स्मारकाच्या कामाचा मार्ग मोकळा झाल्याचे खासदारांनी सांगल्याने भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितले की, स्मारकाच्या आवश्यक असलेली परवानगी राज्य सरकारकडून मी प्राप्त करुन घेतली आहे. त्यासाठी एक समितीही तयार केली. स्मारक होईपर्यंत त्याठीकाणी डॉ. आंबेडकरांचा एक पुतळाही बसविला होता. स्मारकाचा पाठपुरवा करीत असताना स्मारकाच्या कामात शिवसेनेने अडथळे आणले. आता निवडणूका जवळ आल्याने दलित समाजाला खूष करण्यासाठी स्मारकाचा मार्ग मोकळा झाल्याचा दावा केला जात आहे. समृद्धी महामार्गास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे ही मागणी यापूर्वीच मी सरकारकडे केली आहे. ही मागणी सरकारने मान्य करावी असं गायकवाड यांनी म्हटले आहे.