अहमदनगर जिल्हा शल्यचिकित्सक व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इंजिनियरला पदावरून हटवा- बाळा नांदगावकर

Update: 2021-11-08 12:49 GMT

अहमदनगर :  अहमदनगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोरोना अतिदक्षता विभागात दोन दिवसांपूर्वी लागलेल्या आगीत 11 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला होता. यासंदर्भात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पदाधिकाऱ्यांसह जिल्हा शासकीय रुग्णालयाला भेट देत दुर्घटना स्थळाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी सध्या कार्यरत असलेले जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्याशी एकूण आग प्रकरणा संदर्भात चर्चा केली. त्यावेळी पाहणी दरम्यान अनेक पोलीस अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान यावेळी माध्यमांशी बोलताना बाळा नांदगावकर यांनी म्हटले की, सिव्हिल सर्जन यांच्याशी झालेली चर्चेच्या अनुषंगाने असे दिसून येत आहे की, या ठिकाणी फायर ऑडिट झालेले असताना आणि या ठिकाणी तांत्रिक दुरुस्त्या सुचवलेल्या असतानाही त्या केल्या गेल्या नाहीत, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाची असलेली तांत्रिक आणि बांधकामाची जबाबदारी संबंधित इंजिनिअर यांनी पार पाडल्याचे दिसून येत नसल्याचे प्राथमिक दिसत आहे. आता जर या दुर्घटनेची चौकशी होत असताना जिल्हा रुग्णालयाचे विद्यमान जिल्हा शल्य चिकित्सक हेच त्या पदावर कार्यरत असतील तर ही चौकशी निर्धोक होऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांना सर्वप्रथम त्या पदावरून हटवण्याची गरज आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित इंजिनियर यांनाही तात्काळ निलंबित केले पाहिजे असे म्हटले आहे.

संबंधित अधिकारीच जर त्या पदावर कार्यरत असतील तर त्या घटनेला नेमके जबाबदार कोण? हे पुढे येणार नाही त्यामुळे समितीने चौकशी करण्यापूर्वी जिल्हा शल्यचिकित्सक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित इंजिनियर यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि त्यांना या चौकशी पासून दूर ठेवले पाहिजे अशी मागणी बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी बोलताना केली.

Tags:    

Similar News