खासदार सुजय विखे यांनी मागितली पत्रकारांची माफी ; गडकरींच्या दौऱ्यानिमित्त भाजपमधील विसंवाद आला समोर
अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे ४ हजार कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्गाचे भूमिपूजन व लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी (दि. २) होणार असल्याची माहिती भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. मात्र हीच माहिती बुधवारी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन दिली होती. त्यामुळे नितीन गडकरी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील विसंवाद व अंतर्गत चढाओढ समोर आली. आमच्यामध्ये विसंवाद झाला आहे हे मान्य करतानाच पत्रकारांना एकाच विषयासाठी दोन पत्रकार वेगवेगळ्या पत्रकार परिषदेसाठी यावं लागलं याबद्दल खा. डॉ. विखे यांनी पत्रकारांची माफी मागितली. सोबतच भाजप खासदारांच्या आधी भाजप शहर जिल्हाध्यक्षांकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा नियोजित दौरा कार्यक्रम कसा आला? या पत्रकारांच्या प्रश्नावर शहर जिल्हा अध्यक्ष गंधे यांचा प्रधानमंत्री कार्यालय, गडकरी यांच्याकडे थेट संबंध असावा, असं उत्तर खा.विखे यांनी दिले.
शनिवारी सकाळी ११ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह जिल्ह्यातील आमदार व खासदारांना निमंत्रित करण्यात आले आहे.
दरम्यान भाजपच्या वतीने दोन पत्रकार परिषद घेण्यात आल्याच्या मुद्द्यांवरून पत्रकारांनी खा. विखे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर त्यांनी म्हटले की, गंधे यांनी पत्रकार परिषद कशाच्या आधारे व कधी घेतली, हे मला माहीत नाही, मात्र, दुपारी २ वा. सर्व कार्यक्रम गडकरी यांच्या कार्यालयाकडून अंतिम झाल्यानंतरच मी माहिती जाहीर करत आहे. मी खासदार या नात्याने आपल्याला कार्यक्रमाचे निमंत्रण देत आहे.
भाजप शहर जिल्हा अध्यक्ष गंधे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला पक्षाचे पदाधिकारी सुनील रामदासी, सचिन पारखे, नरेंद्र कुलकर्णी, विवेक नाईक आदी उपस्थित होते तर खा. विखे यांच्या समवेत माजी मंत्री शिवाजी कर्डिले, पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग आदी उपस्थित होते.
दरम्यान एकीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 4 हजार कोटींच्या कामाचे भूमिपूजन होत असताना दुसरीकडे नगर-मनमाड महामार्गाच्या दुरवस्थेचे काय? यावर खा. विखे म्हणाले की, दुरुस्तीसाठी आपण ५०० कोटी रुपये मंजूर करून आणले. ठेकेदार नियुक्त झाला. वर्क ऑर्डर देखील निघाली, मात्र त्याने काम न केल्याने महिन्यापूर्वी निलंबित करण्यात आले. त्यानंतर पुन्हा ठेकेदार नेमला, परंतु त्यानेही काम केले नाही याबद्दल विखे यांनी हतबलता व्यक्त केली.सोबतच कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गच्या ठेकेदारला निलंबित करण्याची मागणी आपण गडकरी यांच्याकडे शनिवारी होणाऱ्या कार्यक्रमात करणार असल्याचेही विखे यांनी सांगितले.