मुंबई – सामाजिक कार्यामुळं परिचित असलेल्या दिल से फाऊंडेशननं तिरूमला मल्टिस्टेट कॉ-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड च्या वतीनं ५ ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरातून १८० रक्तपिशव्या जमा करण्यात आल्या आहेत.
क्रांती शानबाग आणि कपिल झवेरी यांच्या पुढाकारातून दिल से फाऊंडेशन समाजाच्या उन्नतीसाठी आणि मानवी दृष्टिकोनातून समाजसेवा करत आहे. त्याच अनुषंगानं दिल से फाऊंडेशननं तिरूमला मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या वतीनं राजकोट, मोरबी, वर्धा, नागपूर आणि कारवार या पाच ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. रूग्णांवर उपचार करण्यासाठी रक्ताची कमतरता नेहमी भासत असते. याच जाणिवेतून दिल से फाऊंडेशननं रक्तदान शिबिर उपक्रम राबवायला सुरूवात केलीय. या शिबिरानंतर फेब्रुवारी महिन्यात मुंबई, गोवा आणि महाराष्ट्रातही रक्तदान शिबिराचं आयोजन दिल से फाऊंडेशनच्यावतीनं करण्यात येणार आहे.
दिल से फाऊंडेशनच्या वतीनं दररोज रस्त्यावरील भटक्या जनावरांना खाद्य दिलं जातं, १ हजार पेक्षा जास्त सॅनिटरी नॅपकिन्स दरमहा मोफत दिले जातात, याशिवाय फाऊंडेशन मागील ३ वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून समुद्रकिना-यांची स्वच्छताही करत आहे, याशिवाय वृद्धाश्रमांनाही त्यांच्या प्राथमिक गरजांसाठी फाऊंडेशनकडून मदत दिली जाते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांच्या शिक्षणासाठीही फाऊंडेशन विविध उपक्रम राबवत आहे.