धनंजय मुंडे - शेतकऱ्यांच्या विकासाचे मंत्री नव्हे मंत्र!

महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने प्रशांत भास्करराव जोशी यांचा लेख;

Update: 2024-07-15 10:03 GMT

धनंजय मुंडे हे नाव घेतलं की सगळ्यात अगोदर डोळ्यासमोर त्यांचं रुबाबदार व्यक्तिमत्व, त्यांचं बहारदार व खास शैलीतील वक्तृत्व आणि त्यांचे विकासाभिमुख नेतृत्व या बाबी सर्वांच्या लक्षात येतात.

अनेक वर्ष संघर्षात घालवल्यानंतर प्रथमच सत्तेत आल्यावर धनंजय मुंडे यांनी सुमारे अडीच वर्षे सामाजिक न्याय विभागाचा पदभार सांभाळला. त्यावेळी 32 नंबरचे समजले जाणारे सामाजिक न्याय हे खाते मी एवढे प्रतिष्ठित करून दाखवेल की स्वतः राज्याचे मुख्यमंत्री हे खातं स्वतःकडे ठेवतील असं जाहीरपणे आमचे साहेब म्हणाले आणि पुढील अडीच वर्षात त्यांनी ते करूनच दाखवलं!

महायुतीच्या सरकारमध्ये मुंडे साहेबांकडे कृषी खाते आले. शेतकऱ्यांवर सातत्याने येणारी नैसर्गिक संकटे आणि नैसर्गिक असमतोल यामुळे नेहमीच कृषिमंत्री हे टीकेचे धनी असतात. मात्र संकटांना विरोधातपणे कसे सामोरे जायचे आणि त्यातून प्रगती आणि विकासाचा नवा मार्ग कसा शोधायचा हे 'मुंडे' यांना चांगले जमते.

अलीकडच्या काळात मुंडे साहेब कृषी मंत्री झाल्यापासून पीएम किसान सारखी शेतकऱ्यांना थेट अर्थ सहाय्य देणारी योजना दुप्पट करून राज्य सरकारच्या माध्यमातून चालवणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. त्याचबरोबर केवळ एक रुपया भरून शेतकऱ्यांना विमा भरता येईल असेही महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य आहे हे स्वतः केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान साहेब यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्लीत जाहीरपणे सांगितले.

आत्ता काही दिवसांपूर्वीच हळदीच्या शेतात कोळपणी करताना बैलांच्या ऐवजी घरातील सदस्यांना जुंपलेल्या हिंगोली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचा व्हिडिओ समोर आला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडे साहेबांची माणसं त्या शेतकऱ्याच्या दारात बैलांची जोडी घेऊन पोहोचले. हे राज्यात वेगवेगळ्या माध्यमांच्या बातम्यांमधून सर्वांनीच पाहिले! शेतकऱ्यांच्या प्रति इतकं संवेदनशील असणार हे नेतृत्व, शेतकऱ्यांच्या प्रगती आणि आर्थिक उन्नतीचे कायम ध्येय उराशी बाळगून काम करत असते.

देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला त्याचबरोबरीने आता दाळी आणि अन्य कडधान्यांच्या बाबतीत सुद्धा देश शंभर टक्के स्वयंपूर्ण बनला आहे आणि यामध्ये मागील एक वर्षांमध्ये सर्वात मोठा वाटा महाराष्ट्राचा आहे हे सुद्धा मुंडे साहेबांच्या टीम मध्ये काम करणारा एक सहकारी म्हणून मला अभिमानाने सांगावे वाटते.

आज चॅट जीपीटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नवनवीन तंत्रज्ञान अवलंबून देश जागतिक महासत्तेकडे वाटचाल करत असताना या देशातला शेतकरी सुद्धा बरोबरीने या प्रगतीच्या रथात बसला पाहिजे या दृष्टीने प्रत्येक निर्णय घेताना शेतीमध्ये सुद्धा आता ड्रोन ने फवारणी करावी, शेतात कोणतेही पिक घेण्या अगोदर त्या मातीचे परीक्षण केले जावे, त्याचबरोबर मातीचा असलेला पोत बघूनच त्याप्रमाणे कोणते पीक घ्यायचे हे ठरवले पाहिजे, यांसारख्या बारीक परंतु अत्यंत महत्त्वाच्या संशोधनाला धनंजय मुंडे हे कृषिमंत्री म्हणून प्राधान्य देत आहेत.

अनेक जुन्या योजनांना नाविन्यपूर्ण रूप देऊन तसेच आणखी नव्या विविध योजना आखून त्या खऱ्या गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतील या दृष्टीने देखील बारकाईने नियोजन ते करतात.

जगाच्या पाठीवर आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर करून माती पासून ते सूर्यकिरणांपर्यंत विविध नैसर्गिक बाबींचा शेतीच्या उत्पादनात भर टाकण्यासाठी कसा वापर केला जाईल यासाठीचे विशेष संशोधन सुद्धा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात राज्य शासनामार्फत हाती घेण्यात आले आहे.

स्वतः जन्माने मराठवाड्यातील जरी असले तरी मराठवाडा जितका प्रिय आहे तितकाच विदर्भ तितकेच कोकण आणि तितकाच संपूर्ण महाराष्ट्र या पद्धतीने केवळ आणि केवळ आपल्या खात्याचा शेवटचा शेतकरी सुद्धा लाभार्थी ठरला पाहिजे या दृष्टीने काम करणारे धनंजय मुंडे हे शेतकऱ्यांच्या विकासाचे मंत्री नव्हे तर शेतकऱ्यांच्या विकासाचा मंत्र ठरतील आणि कृषी खात्याची सुद्धा आणखी प्रतिष्ठा वाढवली जाईल असा विश्वास मला आहे.

शेतकऱ्यांच्यासाठी काम करत असताना कोणताही भेदभाव उराशी न बाळगता कायमच जे करायचे ते अगदी मनापासून अशी भूमिका ठेवून काम करणाऱ्या माझ्या साहेबांना जन्मदिनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा!

Tags:    

Similar News