पु.लं. च्या स्मृती दिनानिमित्त ट्विट, त्या वाक्यामुळे फडणवीस ट्रोल...
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत.;
अवघ्या महाराष्ट्राच्या अनेक पिढ्या ज्यांचे साहित्य वाचत आणि हसत मोठ्या झाल्या, त्या पु.लं. देशपांडे यांचा आज स्मृतीदिन....पु.लं.च्या स्मृती दिनानिमित्त अनेकांनी त्यांना अभिवादन केले. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विट करुन पु.लं.ना आदरांजली वाहिली. पण या ट्विटमुळे फडणवीस सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये "प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे. पु. ल. देशपांडे मराठी भावविश्व, विनोदवीर, लेखक, थोर साहित्यिक, महाराष्ट्रभूषण श्री. पु. ल. देशपांडे यांची आज पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतिस विनम्र अभिवादन.." असे म्हटले आहे.
आता फडणवीस ट्रोल का झाले असा प्रश्न तुम्हाला पडला असेल...तर त्यातील मुद्दा असा आहे की 'प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे' हे वाक्य पु.लं.नी सखाराम गटणे या त्यांच्या पात्राच्या तोंडी लिहिले आहे. त्यात स.तं.कुडचेडकर यांनी आपल्या एका पुस्तकात हे वाक्य लिहिल्याचे गटणे पु.लं. ना सांगतो. त्यामुळे हे वाक्य पु.लं.नी विडंबनात्मक पद्धतीने लिहिले आहे. पण फडणवीस यांनी आदरांजली वाहण्यासाठी नेमके एवढेच वाक्य उचलून वापरल्याने ते ट्रोल झाले आहेत. यामध्ये एका नेटवकऱ्याने फडणवीस यांना म्हटले आहे की,
"साहेब..ते वाक्य सखाराम गटणे ह्या पु लं च्या पात्राच्या तोंडी आहे. सखाराम किती छापील वाक्यांच्या आहारी गेला होता हे वाचकला कळावे आणि विनोद निर्मिती व्हावी हा त्यामागील उद्देश. पु लं च्या बाबतीत म्हणायचं तर एवढंच म्हणा...'ह्या माणसाने आम्हाला हसविले'..पु लं ची इच्छा देखील तीच होती"
तर डॉ. अजित यांनीही फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. अहो, हे पुलंनी उपरोधाने लिहिलेलं आहे सखाराम गटणे मध्ये...!! तुम्ही वाचले नाही पुलं की तुम्हाला कळले नाहीयेत एकीकडे फडणवीस यांनी वेगळ्या संदर्भासाठी ते वाक्य वापरल्याने त्यांच्यावर टीका होते आहे. तर दुसरीकडे अनेक नेटकऱ्यांनीही फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांनीही पु.लं.चे साहित्य वाचले नसल्याचे त्यांच्याच प्रतिक्रियांवरुन उघड झाले आहे. यामध्ये हे वाक्य पु.लं.चे नसून स.तं. कुडचेडकर यांचे आहे असे काहींनी म्हटले आहे. यामध्ये काहींनी तर ठामपणे हे वाक्य पु.लं.चे नसून कुडचेडकरांचे असल्याचे सांगितले आहे.
पुलंच्या 'व्यक्ती आणि वल्ली' या कथासंग्रहातील 'सखाराम गटणे' या प्रकरणात या वाक्याचा उल्लेख आहे. सखाराम गटणेला मिळेल ते पुस्तक वाचण्याची सवय असते. स.त.कुडचेडकर यांचे "केतकी पिवळी पडली" या पुस्तकाचा उल्लेख त्यात आहे. पण ते एक कल्पित उदाहरण आहे, पण वाक्य पु.लं.चेच आहे हे मात्र खरे... नेत्यांनी किंवा सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर व्यक्त होतांना किती खबरदारी घेतली पाहिजे हेच यावरुन सिद्ध होते आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या व्यासंगावर टिका करण्यासाठी पु.ल. देशपांडे यांचा हा व्हिडीयो ही व्हायरल होत आहे