क्रूझ पार्टीप्रकरणाबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा मोठा गौप्यस्फोट

Update: 2021-10-10 01:35 GMT

क्रूझ पार्टीवरील एनसीबीनं केलेल्या कारवाईबाबत राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांनंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. एनसीबीनं कारवाई केली, तेंव्हा काही लोकांना अटक करण्यात आली. तर काहींना सोडून देण्यात आलं. यामध्ये राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याच्या मुलाच्या अतिशय जवळच्या व्यक्तीलाही सोडून देण्यात आलं. मात्र त्याचा याप्रकरणात कोणताही समावेश नव्हता, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे देवेंद्र फडणवीस नागपूरात बोलत होते.

फडणवीसांच्या वक्तव्यानं या प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. फडणवीसांनी कोणत्याही नेत्याचं नाव घेतलं नाही. त्यामुळे तो राजकीय नेता कोण? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा निर्माण झाली आहे. नेमकं काय म्हणाले फडणवीस? "या कारवाईत एनसीबीनं अनेकांना ताब्याचे घेतलं होतं. यात जे लोक क्लीन होते अशा लोकांना सोडून देण्यात आलं. ज्यांच्याकडे काही सापडलं त्यांनाच एनसीबीनं पकडलं. ड्रग्ज ही समाजाला लागलेली कीड आहे आणि याविरोधात जी संस्था काम करतेय त्या संस्थेच्या पाठिशी आपण उभं राहिलं पाहिजे. पण या प्रकरणात राजकारण केलं जात आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याच्या मुलाचा एक अतिशय जवळचा माणूस देखील होता. पण तो क्लीन असल्याने मी त्याचं नाव घेत नाही. त्याचं नाव घेऊन त्याला बदनाम करणं अयोग्य आहे", असं फडणवीस म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याने चर्चांना उधाण आलं आहे.

नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना नवाब मलिक यांचं दुखणंच वेगळं आहे. त्याविषयी मी याआधीही बोललो आहे. आता पुन्हा त्यावर बोलून काही उपयोग नाही, अशी खोचक टीका फडणवीसांनी केली. 

Tags:    

Similar News