देवेंद्र फडणवीसांनी घेतली शरद पवारांची भेट

Update: 2021-05-31 08:50 GMT

कोरोना महामारीबरोबरच राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न पेटलेला आहे. त्यातच आज राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे शरद पवार यांची भेट घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात ट्वीट करुन माहिती दिली आहे.

या भेटीचे अनेक राजकीय अर्थ लावले जात असून राज्यात मराठी आरक्षणाबरोबरच राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांचं प्रकरण गाजत असताना ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये देवेंद्र फडणवीस यांची महाविकास आघाडीवरील टिकेची धार कमी झाली आहे. त्यातच शरद पवार यांनी मध्यंतरी वर्षावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये सरकार टिकवण्याची जबाबदारी फक्त आपली नाही. असं मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांनी सांगितल्याचं वृत्त अनेक माध्यमांनी दिलं आहे.


त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात असून 5 राज्यांच्या निवडणुकांनंतर राज्यात भाजप 'मिशन लोटस' सुरु झालं आहे का? याबाबत आता चर्चेला सुरुवात झाली आहे.

'ही' मिशन लोटसची चाहूल आहे का?

महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटीची लाच मागितल्याचा आरोप केला जात आहे. तर दुसरीकडे अनिल परब यांचं देखील प्रकरणात नाव घेतलं जात आहे. त्यामुळं भाजपने केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत महाविकास आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांवर दबाव निर्माण केला आहे. त्यानंतर ही भेट होत आहे.

मध्यंतरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फेसबूक लाईव्ह नंतर उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे देवेंद्र फडणवीस देखील शांत आहेत. फक्त फडणवीसच नाही तर पूर्ण भाजप नेते शांत आहेत. त्यामुळं भाजप या 5 राज्याच्या निवडणुकानंतर मिशन लोटस साठी प्रयत्न करत आहे का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो.

जर भाजपने मिशन लोटस साठी प्रयत्न केले नाही तर भाजपचे काही आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देऊ शकतात. तसंच गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता घटत असून उद्धव ठाकरे यांना लोकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. ही बाब 'हिंदू व्होट बॅक' असणाऱ्या भाजपला धोकादायक आहे. कारण भाजप आणि शिवसेना यांचा मतदार हा समविचारी आहे. त्यामुळं भाजपचा मतदानाचा टक्का घटू शकतो.

एकंदरीत या सर्व मुद्द्याचा विचार करता महाराष्ट्रात मिशन लोटस सुरु होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच महाविकास आघाडीच्या शिल्पकार असणाऱ्या शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची अचानक झालेली सदिच्छा भेट खूप काही सांगून जाते.

Tags:    

Similar News