माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शरद पवार यांची भेट घेणार आहेत. शरद पवार यांची ३१ मार्चला शस्त्रक्रिया पार पडली होती. शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास जाणवल्यानं त्यांच्या पोटातील पित्ताशयाचे खडे इंन्डोस्कोपीद्वारे काढण्यात आले होते. त्यानंतर पवार यांना रुग्णालयातून डीस्चार्ज देण्यात आला आहे. त्यातच आज फडणवीस शरद पवार यांची भेट घेणार असल्याचं समजतंय.
फडणवीस यांनी पवार यांच्या शस्त्रक्रियेपुर्वी २९ मार्चला एक ट्वीट केले होते. या ट्विटमध्ये फडणवीस यांनी श्री. शरद पवारजी यांच्या प्रकृती अस्वास्थ्याबाबत कळले. त्यांना लवकर बरे वाटावे, अशी मी प्रार्थना करतो,' असं ट्वीट केलं होतं. त्याचबरोबर फडणवीस यांनी पवार यांच्या तब्येतीची चौकशी देखील केली होती.
त्यानंतर खासदार नारायण राणे यांनी देखील पवार यांची कुटुंबासह भेट घेतली होती. मात्र, राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आणि शरद पवार, अमित शहा यांच्या कथित भेटीनंतर ही भेट होत असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आलं आहे. या संदर्भात महाराष्ट्र टाईम्सने वृत्त दिलं आहे.