तौक्ते चक्रीवादळामुळे रायगड, सिंधुदुर्ग , रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आज रायगड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांनी पाहणी करून जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून एकूण नुकसानी बाबत आढावा घेतला. देवेंद्र फडणवीस हे तीन दिवसांच्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर देखील पाहणी दौर्यात सहभागी झाले आहेत. तौक्ते चक्रीवादळामुळे अलिबाग येथील कोळीवाड्यातील घरांचे तसेच बंदरातील बोटींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, झालेल्या नुकसानीची पाहणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली. ह्या नैसर्गिक संकटात आम्ही आपत्तीग्रस्तांच्या सोबत आहोत, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
२० तारखेला ते महाड भागातील नुकसानीची पाहणी करणार...
दोन्ही विरोधी पक्ष नेते ३ दिवसांच्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असून भाजप महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण, भाजपा आमदार प्रसाद लाड, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रवींद्र पाटील आमदार महेश बालदी या दौऱ्यात सहभागी झाले आहेत.
मागीलवर्षी निसर्ग चक्रीवादळ आणि यावेळच्या तौक्ते चक्रीवादळाने मासेमारी उद्योगावर विपरीत परिणाम झाला आहे. यातून सावरण्यासाठी मदतीसाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी यावेळी अलिबाग येथील मच्छीमारांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
यावेळी त्यांच्यासोबत रायगडचे माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपाचे रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांनी अलिबाग बंदराला भेट देण्यापुर्वी उसर येथील चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून नुकसानीचा आढावा घेतला.
रायगड जिल्ह्यात चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका अलिबाग तालुक्याला बसला. यामध्ये काही मासेमारी नौकांची मोडतोड झाली आहे. अलिबाग मासेमारी बंदरात त्यांनी मच्छीमारांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या. सातत्याने येणारी चक्रीवादळे आणि लॉकडाऊनमुळे मागील वर्षभर मासेमारी व्यवसाय धोक्यात आल्याचे मच्छीमारांनी फडवणीसांच्या निदर्शनास आणून दिले.
अशा परिस्थितीत मागील तीन वर्षाचा डिझेल परतावा अद्याप मिळालेला नाही. याची रक्कम 2 कोटी 29 लाख इतकी आहे. दिवसेंदिवस खर्च वाढत असताना शासनाकडून डिझेल परतावा, निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची मदत मिळत नसल्याने मासेमारी व्यवसाय तोट्यात चालला आहे, असे येथील मच्छीमारांचे म्हणणे आहे.
दोन्ही विरोधी पक्ष नेते ३ दिवसांच्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असून भाजप महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण, भाजपा आमदार प्रसाद लाड, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रवींद्र पाटील, आमदार महेश बालदी, ही या दौऱ्यात सहभागी झाले आहेत.