परमबीर सिंगांच्या आरोपांच्या चौकशीसाठीची समिती म्हणजे धूळफेक : देवेंद्र फडणवीस

Update: 2021-03-31 14:56 GMT

सचिन वाझे प्रकरणी मुंबईच्या आयुक्त पदावरुन उचलबांगडी झालेल्या परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील आरोपांची चौकशी करण्यासाठी सरकारने समिती गठीत केली आहे. पण ही समिती म्हणजे धूळफेक असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

गृहमंत्र्यांवरील आरोपांची चौकशी करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या न्या. के. यू. चांदीवाल समितीला साध्या समितीचा दर्जा देण्यात आला आहे. या समितीला न्यायालयीन आयोगाचे अधिकार देण्यात आलेले नाहीत, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. कमिशन्स ऑफ इन्क्वायरी अॅहक्ट 1952 अंतर्गत ही समिती गठीत करण्यात आलेली नाही, ना त्यांना या कायद्यानुसार अधिकार प्रदान केले गेले आहेत.

आमच्या काळात न्या. झोटिंग समिती गठीत करताना त्यांना या कायद्यांतर्गत सर्व अधिकार प्रदान करण्यात आले होते. त्यामुळे ही समिती म्हणजे निव्वळ धूळफेक आहे आणि या प्रकरणातील आरोपांची तीव्रता आणि गांभीर्य लक्षात घेता,त्यातून कोणताही हेतू साध्य होणार नाही. कोणतेही अधिकार नसताना उच्च न्यायालयाचे एक निवृत्त न्यायाधीश विद्यमान गृहमंत्र्यांविरोधात चौकशी कशी करणार, असा प्रश्न निर्माण झाल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

Tags:    

Similar News