आदिवासींची सावकार धनिकांनी बळकावलेली जमीन परत मिळणार; भिवंडीत आदिवासींना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सातबारे वाटप
गुलामगिरी विरुद्ध ही लढाई केवळ आर्थिक नाही, सामाजिक,शैक्षणिक अशा सर्व गोष्टींबाबत परिवर्तन करण्याची गरज आहे. - फडणवीस;
मुंबई : "दोन चिखलेकर भाऊ माझ्या नवऱ्याला एका कडून दुसऱ्याकडे लाथांनी तुडवत होते, मी नवऱ्याला वाचवायला गेली त्यांच्या पाया पडू लागली तेव्हा त्यांनी माझ्या २-४ चापटी मारून, मला खाली पडले आणि माझ्या उजव्या मांडीवर पाय ठेवून डावा दावा पाय वर पकडून तुला उभी चिरून टाकेन असं म्हणत उचलून फेकून दिले. त्याचा मार खाऊनच नंतर माझा नवरा मेला" हे सांगत असताना बेबी धाडगे या पीडित कातकरी महिलेला हुंदके फुटत होते, तिच्या हुंदक्यानी आणि आक्रोशाने उपुख्यमंत्र्यांसह सह्याद्री अतिथीगृहाच्या भिंती देखील हेलवल्या.
भिवंडी तालुक्यातील राहुर गावातील भूमिहीन आदीम कातकरिंना १९७८ साली दिलेल्या जमिनी तेथील मालकांनी बळकावल्या प्रकरणी विवेक पंडित यांच्या आढावा समितीचे दिलेल्या धक्कादायक अहवालाच्या पार्श्वूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिगृहावर बैठक पार पडली. यावेळी येथील आदिवासी बांधवांवर तेथील बिगर आदिवासी मालकांनी सावकारांनी केलेल्या जुलूम आणि अत्याचाराबाबत कथन ऐकून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भावनिक झाले. यावेळी फडणवीस यांनी महसूल वन आणि पोलीस विभागाला स्पष्ट निर्देश देत आदिवासी बांधवांच्या जमिनी तात्काळ त्यांना परत करण्याचे आदेश दिले. तसेच, त्या पीडित आदिवासींना त्यांच्या जमिनीचे सातबारे देत जमिनींची मोजणी करत तिथे स्वच्छ पाटी लावत आदिवासींचा हक्क पुनर्स्थापित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला दिल्या. नुसती जमीन देऊन चालणार नाही तर, हे भयभीत आदिवासी बांधव कुठल्या परिस्थिती आहे याची पोलिसांनी वेळोवेळी तपासणी करावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी, भुमाफिया गुंड लोकांवर दहशत बसेल असे काम पोलीसांनी करत या बांधवांना भयमुक्त करायला हवे असेही फडणविस यांनी सांगीतले. आजही आपल्या राज्यात गुलामगिरी आहे, वेठबिगारी व कुपोषण आहे ही शोकांतिका असल्याची खंत व्यक्त करत उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्याच्या अमृतकाळात आदिवासी विशेषतः कातकरी आदीम बांधवांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी शासन प्रशासन कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित (मंत्री दर्जा)यांनी आढावा समितीच्या दौऱ्या दरम्यान राहुर गावातील भूमिहीन आदिवासींना शासनाने कसण्यासाठी दिलेल्या जमीनि वर्षानुवर्षे बिगर आदिवासी मालकांनी गुंडगिरी दहशतीच्या बळावर जबरदस्तीने बळकावल्याचे समोर आले होते. त्यामुळे ही परिस्थिती त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी आज सह्याद्री अतिगृहावर याप्रकरणी बैठकीचे आयोजन केले होते.
या बैठकीच्या सुरुवातीला विवेक पंडित यांनी अशा संवेदन विषयाबाबत उपमुख्यमंत्र्यांनी बैठक आयोजित केल्याबाबत त्यांचे आभार मानले आणि आदिवासींच्या जमिनी बळकावल्या प्रकरणाविषयी उपमुख्यमंत्री यांना संक्षिप्त माहिती दिली. तसेच यानंतर पीडित आदिवासी बांधवांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा पाढाच उपमुख्यमंत्र्यांसमोर वाचला. यावेळी बेबी धाडगे आणि तिच्या पतीला आरोपींनी कशाप्रकारे बळजबरीने मारहाण आणि जुलून जबरदस्ती करून जमीन बळकावली याविषयी कथन करताना तिला अश्रू अनावर झाले. बेबी आणि रवींद्र यांनी सांगितलेल्या कहाणीने उपमुख्यमंत्र्यांसह संपूर्ण सभागृह हे लावून गेले.
भिवंडीतल्या राहुर येथील आदिवासींची जमीन वर्षानुवर्षे बिगर आदिवासी मालकांनी बळकावली होती त्या आदिवासींना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सातबारे वाटप करण्यात आले, यावेळी नुसती जमीन देऊन चालणार नाही तर, त्या ती कुठल्या परिस्थिती आहे याची पोलिसांनी वेळोवेळी तपासणी करावी, जेणेकरून जमीन बलकवणाऱ्याना दहशत बसेल असे फडणवीस म्हणाले.
तसेच, गुलामगिरी विरुद्ध ही लढाई केवळ आर्थिक नाही, सामाजिक,शैक्षणिक अशा सर्व गोष्टींबाबत परिवर्तन करण्याची गरज आहे अशी भावना फडणवीस यांनी व्यक्त केली. तसेच, भूमिहीनांना सरकारने दिलेल्या जमिनींचे चावडी वाचन करून सध्याची काय परिस्थिती आहे याबाबत ऑडिट करण्याचे निर्देश दिले. शिवाय, या आदिवासींना परत केलेल्या जमिनीवर पायलट प्रोजेक्ट म्हणून या जमिनीचा वापर काय करू शकतो याच्या आधारावर तपासणी करून कातकरींना योजनांद्वारे कायमचे उत्पन्नाचे साधन देऊ शकू याबाबत योजना बनवण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केली.
आजच्या सभेत विवेक पंडित यांनी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल बोलताना आपल्यात मला आज माजी मुख्यमंत्री वसंत दादा पाटील दिसले असे गौरव उद्गार काढले. कारण कोणतीही समस्या सोडवण्यासाठी अगोदर ती मान्य कारणे गरजेचे आहे. फडणवीस यांनी कुपोषणाचे खरे कारण भूक आहे हे मान्य केलं. त्यानंतर
वेठबिगारी असल्याचे मान्य करत हा कलंक आम्ही पुसणार असे जाहीर केलं आणि आज आदिवासींच्या जमिनी लुबाडल्याचे मान्य करत त्या ताबडतोब परत करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश दिले. पीडित आदिवासींना त्यांचा हक्क मिळवून दिल्या बाबत विवेक पंडीत यांनी "संविधानातील शब्दांना आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थ प्राप्त करून दिला" असे गौरवोउद्गार काढत त्यांचे आभार मानले.
यावेळी राज्यातील प्रमुख अधिकाऱ्यांसह श्रमजीवी संघटनेचे प्रमूख पदाधिकारी होते.