मिलिंद नार्वेकर यांच्यावर आरोप करत ठाकरे गटाच्या उपनेत्याचा राजीनामा

Update: 2023-09-10 16:08 GMT

एकनाथ शिंदे यांच्यापाठोपाठ अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. त्यातच आता आणखी एका माजी मंत्र्याने आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे समोर आले आहे.

उद्धव ठाकरे यांच्याकडून निष्ठावंतांना डावललं जात असल्याची टीका करत मनिषा कायंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. त्यापाठोपाठ अनेक नेत्यांनी ठाकरे गटाची साथ सोडल्याचे समोर आले आहे. त्यातच ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी मंत्री बबनराव घोलप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे बबनराव घोलप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

बबनराव घोलप म्हणाले, आठ दहा महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं की, जे निघून गेलेले आमदार, खासदार पुन्हा निवडून येता कामा नये. त्यावेळी त्यांनी मला शिर्डी किंवा अमरावती यापैकी एका जागेची निवड करायला सांगितली. त्यावेळी मी शिर्डीची निवड केली. मात्र ज्यांनी गद्दारी केली . त्या भाऊसाहेब वाकचौरे यांना पुन्हा पक्षात घेतले. त्यांच्या नेतृत्वात दुष्काळी भागाचा दौरा केला. त्यावेळी मला त्याची कल्पना दिली नाही. वाकचौरे प्रचार करत असताना कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. जर त्यांना उमेदवार करायचे होतं तर मला का सांगितलं. एवढंच नाही तर माझं संपर्क प्रमुख पदही काढून घेण्यात आलं. मिलिंद नार्वेकर असं का करत आहेत, असा सवाल उपस्थित करत राजीनामा दिला आहे. ज्यांची गरज नाही, त्यांना घेतलं जात आहे. ज्यांची गरज आहे, त्यांना डावललं जात आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर पुढील भूमिका स्पष्ट करणार असं, बबनराव घोलप यांनी म्हंटले आहे.

Tags:    

Similar News