उपमुख्यमंत्री अजित पवार तंतोतंत 'घड्याळ' पाळतात ; शिरुर नगरपरिषदेच्या नुतन इमारतीची फित सकाळी 6.59 वा. कापली
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अजित पवार हे वेळ पाळण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या अचूक वेळ पाळण्याचा अनुभव शिरुरकरांनी घेतला आहे. शिरुर नगर परिषदेच्या नुतन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज सकाळी पार पडला. उद्घाटनाची वेळ सकाळी 7 वाजताची असताना अजित पवारांनी बरोबर 6.59 ला फीत कापली.
इमारत उद्घाटनाची वेळ सकाळी 7 वाजताची ठरलेली होती. पण अजित पवारांनी 6. 50 वाजताच कार्यक्रमस्थळी आगमन केले. शिरूर नगरपरिषदेच्या वतीने पवार यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आलं आणि पुढच्या 10 मिनिटांमध्ये इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
यावेळी शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिरुरचे आमदार अशोक पवार, नगरपालिकेचे नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान उद्घाटनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरुर नगरपालिका इमारतीची बारकाईने पाहणी केली. बांधकाम कसं झालं आहे, कोणत्या त्रुटी तर नाहीत ना?, याची त्यांनी पाहणी केली.
माणिकचंद ग्रुपचे संचालक ,नगरपरिषदचे सभागृह नेते प्रकाश धारिवाल यांना अजित पवार यांनी
टोमणा मारत, तुमच्यामुळे शिरुरमधील जमिनीच्या किंमती वाढल्या, असं ते म्हटलं आहे.