उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बैलगाडा शर्यतींबाबत भूमिका केली स्पष्ट, म्हणाले...
आज काही भागात बैलगाडा शर्यतींच्या आयोजनाचा घाट घातला जात असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या शर्यतींबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. कोरोनामुळे राज्यावर आलेलं संकट मोठं असून आपण अशा कार्यक्रमांना मुरड घालायला हवी, असं आवाहन त्यांनी केलं आहे.;
मुंबई // राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सरकारने ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून काही निर्बंध लागू केलेत. ओमिक्रॉनचा प्रसार देखील मोठ्या संख्येने होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात इतर गोष्टींवर निर्बंध लागू केले जात असताना नुकतीच सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिलेल्या बैलगाडा शर्यतींचं काय? असा सवालउपस्थित केला जात आहे. काही भागात बैलगाडा शर्यतींच्या आयोजनाचा घाट घातला जात असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या शर्यतींबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.
कोरोनामुळे राज्यावर आलेलं संकट मोठं असून आपण अशा कार्यक्रमांना मुरड घालायला हवी, असं आवाहन त्यांनी केलं आहे. "कुणीही व्यक्ती असली तरी, हे जगावर आलेलं मोठं संकट आहे. आपल्याला माणसाच्या जिवाशी खेळता येणार नाही. टास्क फोर्सच्या बैठकीनंतर मुख्य सचिवांना सूचना दिल्यात की सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश काढा. राज्याचे प्रमुख या नात्याने जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्यामुळे शर्यती किंवा इतर कार्यक्रमांना आपण मुरड घालायला हवी", असं पवार म्हणालेत.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज कोरेगाव भिमा येथे जाऊन जयस्तंभाला मानवंदना दिली. यावेळी त्यांच्यासोबत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे देखील होते.