'बैल' हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्याची मागणी

‘बैल’ हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्याची मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री परशोत्तम रूपाला यांच्याकडे केली आहे.;

Update: 2021-08-05 04:26 GMT

मागील अनेक वर्षांपासून सर्वांचेच लक्ष लागलेल्या आणि बंद असलेल्या बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठीचा निर्णय अंतिम टप्प्यात आला असतानाच केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल झाल्याने परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली आहे. तरी देखील बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हाव्यात यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री परशोत्तम रूपाला यांची भेट घेऊन बैल हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्याची मागणी केली आहे.

या भेटी दरम्यान खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी शेतकरी बैलांची कशी काळजी घेतो , त्यांचे संगोपन कसे करतो याबद्दल पशुसंवर्धन मंत्री रूपाला यांना एका व्हिडीओच्या माध्यमातून माहिती दिली. सोबतच मागील 400 वर्षांपासूनची परंपरा आणि संस्कृती असलेल्या बैलगाडा शर्यतींची देखील माहिती दिली. बैलगाडा शर्यत म्हणजे ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावणारी व्यवस्था आहे असं यावेळी खा. कोल्हे यांनी रूपाला यांना सांगितले. शिवाय बैलगाडा शर्यत सुरू केल्याल आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना मिळू शकते असंही कोल्हे म्हणाले.

मागील अधिवेशनात तत्कालिन केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री गिरीराज सिंह यांची भेट घेऊन डॉ. कोल्हे यांनी बैलगाडा शर्यती माहिती त्यांना दिली होती. आणि 'बैल' हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्याचा आग्रह केला होता. त्यावेळी झालेल्या बैठकीत तत्कलिन केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री सिंह यांनी सकारात्मकता दर्शवली होती. मात्र केंद्रीय मंत्रिमंडळात झालेल्या फेरबदल झाल्याने परिस्थिती जैसे थे झाल्याने बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू व्हाव्यात म्हणून खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी पुन्हा प्रयत्न सुरू केले आहेत.

Tags:    

Similar News