शेवगाव तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा आमदार, मंत्री यांनी दौरा केला परंतु हा दौरा फक्त फोटो सेशन साठी मर्यादित होता का ? असा प्रश्न पूरग्रस्त शेतकऱ्यांमधून केला जात आहे, पूर येऊन आज 13 दिवस उलटून गेले आहेत, तरी देखील पंचनाम्या व्यतिरिक्त शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची तातडीची मदत मिळाली नाही,
शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या,अनेकांची घरे कोसळली, त्यांना राहण्यासाठी घर नाही, जनावरांना चारा नाही, लाईट नाही,खायला धान्य नाही, पिण्यासाठी पाणी नाही,एवढे असून देखील शासनाची तातडीची कोणत्याही प्रकारची मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही,
आता तर सर्व गेलेलेच आहे परंतु मदत काय जनावराप्रमाणे माणसे वाहून गेल्यावर मिळणार का ? असा नाराजीचा सूर शेतकरी वर्गातून ऐकायला मिळत आहेत, शेवगाव येथील पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकवटले होते,परंतु दोन दिवस जेवण या व्यतिरिक्त कोणीही ठोस मदत केल्याचे दिसून येत नाही, सत्तेत असलेल्या मंत्री तनपुरे व त्यांच्यासोबत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दौरे केले,परंतु मदत देण्यास ते कमी पडत आहेत हे चित्र समोर दिसत आहे, याबरोबरच जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी आणखी पहाणी दौरा तर सोडाच परंतु जिल्ह्यात कोठेही फिरकले सुद्धा नाहीत,
पावसाने शिवार होत्याचं नव्हतं केलं,नंदीनी नदीकाठच्या लोकांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झालेले पाहायला मिळत आहे,यामध्ये आखेगाव,खरडगाव,वरुर,भगूर,वडुले, गावातील अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत,जनावरांच्या दावणी ओस पडलेल्या आहेत,सर्वत्र घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य झालेले आहे, त्यामुळे जनसामान्यांचे आरोग्य देखील धोक्यात आलेले आहे, त्याचबरोबर अनेकांना तर आपल्या नातेवाईकाकडे आश्रय घ्यावा लागला आहे.
त्यामुळे या पूरग्रस्तांना शासनाने तातडीची मदत द्यावी अन्यथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना काळे झेंडे दाखवले जातील असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.