#delhiprotest : पंजाबला पुन्हा अस्थिर करण्याचे पातक करु नका- शरद पवार

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या हिंसक आंदोलनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया...

Update: 2021-01-26 13:04 GMT

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला दिल्लीमध्ये जे हिंसक वळण लागले त्याला मोदी सरकार जबाबदार आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. पंजाबला पुन्हा अस्थिर करण्याचे पातक करु नका, असा इशाराही पवारांनी दिला आहे. गेल्या २ महिन्यांपासून शेतकरी शांततेने आंदोलन करत आहेत. त्यांच्या मागण्यांची दखल सरकारने वेळेत घेतली असती आणि नवीन कायद्यांबाबत सरकारने योग्य भूमिका घेतली असती तर हा उद्रेक झाला नसता, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांनी कायदा हातात घेणे योग्य नाही पण शेतकऱ्यांवर ही वेळ का आली याचाही विचार मोदी सरकारला करावा लागेल, असेही शरद पवारांनी म्हटले आहे. त्याचबरोबर दिल्लीमध्ये शेतकऱ्यांना रॅलीची परवानगी देण्यात आली तेव्हाच त्यांना रॅलीचा मार्ग व्यवस्थित समजावला असता तर हा गोंधळ झाला नसता. तसेच या रॅलीसाठी पोलिसांनी काही जाचक अटी घातल्याने आंदोलकांना संताप झाल्याचे दिसते, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

दिल्लीत जे घडले त्याचे समर्थन करता येणार नाही पण ते का घडले याचाही विचार केला पाहिजे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. पंजाब आणि हरियाणा या राज्यांमधून देशाची अन्नाची गरज भागवली जाते. देशाच्या सुरक्षेमध्ये या राज्यांचे मोठे योगदान आहे या राज्यांना अशाप्रकारे अस्थिर करणे योग्य नाही असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. मोदी सरकारने आडमुठेपणाची भूमिका सोडून शेतकऱ्यांच्या मागण्यांवर नमते घेऊन योग्य तो तोडगा काढावा असे आवाहन केले आहे.


Tags:    

Similar News