मराठी भाषेला २७ फेब्रुवारी ला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार?
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल यांनी दिली. त्यामुळे 27 फेब्रुवारीला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल का? याबाबत उत्सुकता आहे.;
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र सरकार केंद्राकडे करत आहे. या संदर्भात शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी देखील संसदेत सवाल उपस्थित केला होता.यावर सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी मंत्रालयीन स्तरावर चर्चा सकारात्मक चर्चा सुरू आहे. त्यामुळे लवकरच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जाईल, अशी माहिती दिली होती.
त्यानंतर आज मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री किसन रेड्डी यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान किसन रेड्डी यांनी मराठी भाषेने अभिजात भाषेसाठी असलेले सर्व निकष पूर्ण केले आहेत, अशी माहिती दिली असल्याची माहिती मंत्री सुभाष देसाई यांनी माध्यमांना सांगितले.
तसेच आपण मंत्री किसन रेड्डी यांना २७ फेब्रुवारीला महाराष्ट्रात मराठी भाषा दिनानिमित्ताने यावे आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याची घोषणा करावी, अशी मागणी केल्याची विनंती केली आहे. त्यामुळे आता २७ फेब्रुवारीला मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोणकोणत्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा?
देशात आतापर्यंत तमिळ, तेलगु, संस्कृत, कन्नड, मल्याळम आणि ओडिया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे.
अभिजात भाषेसाठीचे निकष…
एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी त्या भाषेचा 1500 ते 200 वर्षांचा नोंदणीकृत इतिहास असावा आणि प्राचिन काळातील त्या भाषेतील साहित्याचे पुरावे असावेत व त्या भाषेत मुळ साहित्यिक परंपरा असावी, जी इतर भाषांमधून आलेली नसावी, अशा अटी आहेत.
पाहा काय म्हणाले सुभाष देसाई…