दानिश आजाद अंसारी यांना योगी सरकारमध्ये मंत्री पद का देण्यात आले?
योगी सरकारमधील मुस्लीम तरुण चेहरा असलेले दानिश आझाद नक्की कोण आहेत?
उत्तर प्रदेशमधील बलियाच्या बसंतपूर गावात सध्या जल्लोष सुरू झाला आहे. आपल्या गावातील तरुण उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री होईल, याची कल्पनाही गावकऱ्यांनी केली नव्हती. मात्र, दानिश आझाद अन्सारी यांनी योगी मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. दानिश यांचे उच्च शिक्षण लखनऊमध्ये झाले असले तरी त्यांचा गावाशी नेहमीच संबंध राहिला आहे. लखनऊ विद्यापीठात शिकत असताना त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून राजकारणाला सुरुवात केली.
भाजपचा मुस्लिम चेहरा म्हणून ओळख असलेल्या मोहसीन रझा यांना वगळून यावेळी त्यांच्या जागी भाजपने दानिश आझाद अन्सारी यांना संधी दिली आहे. दानिश लखनऊ विद्यापीठातून वाणिज्य शाखेचे शिक्षण घेतले. दानिश यांना मंत्री करण्याच्या निर्णयामागे संघाची भूमिका असल्याचं बोललं जात आहे. योगी यांना योगी यांनी भाषा समितीचे सदस्य केले होते. गेल्या वर्षी दानिश यांना भाजपने अल्पसंख्याक मोर्चाच्या सरचिटणीस पदाचीही जबाबदारी दिली होती.
उत्तर प्रदेशमधील भाजपच्या विजयानंतर दानिश यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून हा विजय सर्व धर्मांचा विजय असल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या या पोस्टचं कौतुक करण्यात आलं होतं. वास्तविक, मुख्तार अब्बास नक्वी यांच्यानंतर भाजप यूपीमध्ये मुस्लिम तरुणाच्या शोधात होती. यूपीमधील मुस्लिम मतदारांची संख्या पाहता भाजपला नेहमीच मुस्लिम चेहऱ्याची गरज असते. पक्षाने गेल्या वेळी मोहसीन रझा यांना मंत्री केले होते. मात्र, महत्त्वाच्या मुदद्यावर ते फारसे बोलताना पाहायला मिळाले नव्हते.
दानिश यांच्या जमेची बाजू म्हणजे ते अन्सारी समुदायातून येतात. यूपीमधील अन्सारी समाज हा मुळात विणकर आहे. आणि अनेक लोक वडिलोपार्जित व्यवसायात गुंतलेले आहेत. पूर्वांचल हा अन्सारी समाजाचा बालेकिल्ला समजला जातो. या समाजाला फारसे राजकीय प्रतिनिधीत्व नाही. त्या समाजाला प्रतिनिधीत्व देऊन नवीन राजकीय गणित तयार करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे.