लाळघोटेपणा बंद करा; जेष्ठ शिवसैनिकाकडूनच शिवसैनिकांवर घणाघाती टीका
'लाळघोटेपणा बंद करा' म्हणत जेष्ठ शिवसैनिकाकडूनच शिवसैनिकांवर घणाघाती टीका करण्यात आली आहे. पारनेरचे पहिले शिवसेना तालुका प्रमुख गुलाबराव नवले यांनी तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांवर ही टीका केली आहे.;
शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे कडवे शिवसैनिक म्हणून परिचित असलेले पारनेर तालुक्यातील पहिले तालुका शिवसेना प्रमुख गुलाबराव नवले यांनी तालुक्यातील शिवसैनिक आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या विरोधात खदखद व्यक्त केली आहे.
एकीकडे राज्यभर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात शिवसेनेकडून जोरदार आंदोलनं सुरू असताना पारनेर मधील शिवसैनिक मात्र भाजप खासदार सुजय विखे यांच्या मागे लाळघोटेपणा करण्यात व्यस्त असल्याचे नवले यांनी म्हटले आहे.
ज्या नारायण राणेंना शिवसेनेने मोठे केले,तेच नारायण राणे बाळासाहेबांचे सुपुत्र व राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्यावर कानाखाली मारण्याची भाषा करत आहे. मात्र तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी भाजपच्या खासदार सुजय विखे यांच्या ओंजळीने पाणी पिण्यात व्यस्त आहे असे नवले यांनी म्हटले आहे. तालुक्यातील एकाही शिवसैनिकांनी नारायण राणे यांचा निषेध केला नाही याचा खेद वाटतो, हे त्यांनी थांबवावे व पक्ष वाढविण्यासाठी कार्यरत राहावे असा सल्ला ज्येष्ठ शिवसैनिक गुलाबराव नवले यांनी यावेळी दिला आहे.
दरम्यान एका शिवसैनिकाकडून शिवसैनिकांवरच घणाघाती टीका होत असल्याने अहमदनगर जिल्ह्यातील राजकिय वातावरण तापले आहे.