राज्यात कोरोना लसीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी कोरोना लस नसल्यानं लोकांना लसीकरण केंद्रावरून परत जावं लागत आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यात तीन दिवस पुरेल इतकाच लसींचा साठा असल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. तीन दिवसानंतर केंद्राकडून लसीचा पुरवठा झाला नाही तर राज्यात लसीकरण बंद पडेल, अशी भीती टोपे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे. मात्र, त्या अगोदरच राज्यात अनेक लसीकरण केंद्रावर लस नसल्यानं लसीकरण बंद पडलं आहे. राज्य सरकार तीन दिवसानंतर लसीकरण बंद होईल असं सांगत असलं तरी गोंदिया जिल्ह्यात सध्याच लसीकरण बंद झालं आहे. जिल्ह्यात कोरोना लसीचा साठा संपल्यानं आरोग्य यंत्रनेचे नियोजन कोलमडून गेलं आहे. त्यामुळे आता गोंदिया जिल्हा प्रशासनाने अजुन कोविड लसीची मागणी केली असून पुण्यावरुन येणाऱ्या साठयाची प्रतीक्षा गोंदिया जिल्हा प्रशासन करत आहे.
गोंदिया जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढला असून सध्या 1928 कोरोनाचे रुग्ण आहेत. कोरोना विषाणुचा नायनाट करण्यासाठी जिल्ह्यात कोरोना लसीकरणीची मोहिम हाती घेण्यात आली आहे. शहरासह जिल्ह्यात लसीकरणाच्या मोहिमेने वेग घेतला आहे. मात्र, गोंदिया जिल्ह्यात सोमवारीच कोरोना लसीचा तुडवडा जाणवला होता. मंगळवारी अखेर कोरोना लसीचा साठा मंगळवारी संपल्याने गोंदिया जिल्हा प्रशासनाला कोरोना लसिकरणाचा गाशा गुंडाळा लागला आहे. गोंदिया जिल्ह्यात राज्य सरकारकडून 1 लाख 11 हजार 890 लसी प्राप्त झाल्या होत्या. त्यात जिल्ह्यात 1 लाख 8 हजार लोकांना कोरोना लस दिली गेली आहे. यात पहिला डोस 97 हजार लोकांना तर दूसरा डोस 12 हजार लोकांना देण्यात आला आहे. जिल्ह्यात अजुनही लसीकरण बाकी असून गोंदिया जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारला 2 लाख 78 हजार 800 डोसेसची मागणी केली आहे. आता कोरोना लस जिल्ह्यात नसल्याने गोंदिया जिल्ह्यात लसीकरण थांबलं आहे.