मुंबईची लाईफलाईन असलेल्या उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी दिवाळीपूर्वीच मोठी बातमी मिळाली आहे. कोविडची लस घेऊन १४ दिवस झालेल्या प्रवाशांना आता मासिक पास सोबत उपनगरीय रेल्वेचं टिकत मिळणार आहे. राज्य सरकारनं अशी शिफारस असलेला प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाला पाठवला असून आज यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. दोन कोविड डोस झाल्यानंतरही रेल्वेतिकीट खिडकीवर फक्त मासिक पास दिला जातो. त्यामुळे एकल प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीट मिळत नसल्याने प्रवाशी नाराज होते.
लसचे दोन्ही डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या सर्व प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली होती. युनिव्हर्सल पास असणाऱ्या प्रवाशांना मात्र मासिक, त्रैमासिक, सहामाही पास मिळत होता. दैनंदिन तिकीट मागितल्यावरील मिळत नव्हते. त्यामुळे संपूर्ण लसीकरण झालेल्या अनेक नागरिकांना लोकल प्रवास करता येत नव्हता. त्यातून तिकिटीशिवाय प्रवास करणारे प्रवासी वाढल्याचेही निदर्शनास आले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रेल्वेचा महसूलही बुडत होता.
राज्य सरकारने मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला एक पत्र लिहिलं असून ज्यांचं संपूर्ण लसीकरण झालं आहे व दुसरी लस घेऊन १४ दिवस पूर्ण झाले आहेत अशा सर्व प्रवाशांसाठी सर्व प्रकारच्या तिकीटसेवा खुल्या करण्यात याव्यात. त्यात तिकीट खिडकीवर पूर्वीप्रमाणे तिकीटही उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे. लोकल तसेच पॅसेंजर ट्रेनने प्रवास करण्यासाठी सर्व प्रकारची तिकीट सेवा खुली करताना जी नियमावली आखून देण्यात आली आहे त्याचेही पालन केले जावे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
ही मुभा देताना ज्याचं संपूर्ण लसीकरण झालेलं नाही, अशा व्यक्तीला लोकल प्रवासास मनाई राहील व याची खबरदारी रेल्वेने घ्यायची आहे. त्यासाठी रेल्वेने आपली संबंधित यंत्रणा राबवावी, असेही सूचित करण्यात आले आहे.
याबाबत आजच निर्णय होईल, अशी शक्यता असून तसे झाल्यास येत्या एकदोन दिवसांत मुंबई उपनगरी रेल्वे मार्गावरील सर्व रेल्वे स्थानकांवर पूर्वीप्रमाणे तिकीटसेवा सुरू होणार आहे.