देशात करोनाचा मोठ्याप्रमाणात उद्रेक होत आहे. एकीकडे महाराष्ट्रात कोरोनाचे दररोज नवनवीन आकडे रेकॉर्ड करत आहेत. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये देखील आता कोरोनाचे आकडे वाढत आहेत. त्यामुळं वाढत्या करोना रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण पडू लागला आहे. रुग्णालयात बेड, ऑक्सिजन उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत असून परिणामी त्यांना आपला जीव गमवावा लागतोय.
योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये ऑक्सिजनची कमी नसल्याचा दावा केला होता. मात्र, वाराणसी, इटावा, फर्रुखाबाद, मुरादाबाद, मेरठसह अन्य शहरांमधल्या रुग्णालयात बेड, ऑक्सिजनचा मोठ्याप्रमाणात तुटवडा जाणवू लागला आहे. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सिजनच्या शोधात भटकंती करावी लागत आहे. तर शहरी भागात असलेल्या रुग्णालयांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचा राग अनावर झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीत करोनाच्या हाहाकारामुळे रुग्णालयांची व्यवस्था कोलमडू लागली आहे. रोहनिया भागात असलेल्या रुग्णालयात डॉक्टर, स्टाफ नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी गोंधळ घालत रुग्णालयाची तोडफोड केली.
रुग्णालयात कोविड रुग्णाला भर्ती केलं. मात्र, कोणत्याही प्रकारची सुविधा, उपचार देण्यात आले नाही. तसेच औषधं द्यायला कुणी नाही. याच दरम्यान एका रुग्णाची तब्येत बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला.
वाराणसी सारखी परिस्थिती इटावामध्ये देखील पाहायला मिळते. करोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे रुग्णालयावर ताण पडू लागला आहे. त्यात रुग्णांच्या नातेवाईकांचा असा आरोप आहे की, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा निव्वळ हलर्गजीपणा सुरु आहे. कोणतीही सोयसुविधा नाही. याच दरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला. मृत महिलेच्या नातेवाईंकांनी रागाच्याभरात कोविड रुग्णालयातील आइसोलेशन सेंटर मध्ये तोडफोड केली. यावेळी डॉक्टारांसोबतही धरपकड झाली.
रुग्णांना चेक करण्यासाठी डॉक्टर उपलब्ध नाही. आम्हालाच ऑक्सिजन सिलेंडर आणावा लागतोय. अशी तक्रार सीएमओकडे नातेवाईकांनी केली असता त्यांनी ऑक्सिजनचा तुटवडा नसल्याचं सांगत आमच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं.
त्याचबरोबर चार दिवसांपासून रुग्ण भर्ती आहे. परंतु उपचारासाठी कुणी नाही. ऑक्सिजन व्यवस्था नाही व्हेंटिलेटर ही बंद आहे. यामुळे रुग्णांचा मृत्यू होत आहे. एका दिवसात 5 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा तेथील लोकांनी केला आहे. वातावरण अधिक तापू लागल्यामुळे वेळीच पोलीस उपस्थित झाले.
दरम्यान उत्तरप्रदेशमध्ये सध्या एकूण 11 लाख 53 हजार 97 रुग्ण असून सक्रीय केसेस 3 लाख 6 हजार 458 आहे. तर 11 हजार 678 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.