मुंबईत 3 दिवस लसीकरण बंद

Update: 2021-04-29 16:25 GMT

कोव्हिड १९ प्रतिबंधक लसींचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेला दैनंदिन लसीकरण मोहिमेचे काटेकोर नियोजन करुनही अडचणींचा सामना करावा लागतो आहे. सद्यस्थितीत उपलब्ध लससाठा संपुष्टात आल्याने उद्या शुक्रवार, दिनांक ३० एप्रिल २०२१ ते रविवार, दिनांक २ मे २०२१ असे तीन दिवस मुंबईतील लसीकरण पूर्णपणे बंद राहणार आहे.

तसेच शनिवार, दिनांक १ मे २०२१ पासून नियोजित १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांचे लसीकरण पुरेशा लससाठ्या अभावी पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे. या दरम्यानच्या कालावधीत, महानगरपालिकेला लससाठा प्राप्त झाला व लसीकरण सुरु होणार असेल तर त्याची माहिती प्रसारमाध्यमं व समाजमाध्यमांतून मुंबईकरांपर्यंत पोहोचविण्यात येईल. नोंदणीकृत पात्र व्यक्तिंनाच आता लस दिली जाणार आहे.

दरम्यान, लसीकरणासाठी ४५ वर्ष व त्यापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना काही केंद्रांवर रांगेत उभे राहून प्रतीक्षा करावी लागत आहे. या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून विनम्र आवाहन करण्यात येते की, ४५ वर्ष व अधिक वयोगटातील सर्व नागरिकांना खात्रीपूर्वक लस मिळेल. त्यासाठी मनात संभ्रम ठेऊ नये. लससाठा उपलब्ध होताच प्राधान्याने त्यांचे लसीकरण करण्यात येईल. त्यामुळे चिंताग्रस्त होऊन लसीकरण केंद्रांवर गर्दी करु नये.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेच्या आणि शासकीय रुग्णालयांमध्ये मिळून ६३ लसीकरण केंद्रांवर तर खासगी रुग्णालयात ७३ लसीकरण केंद्रांवर कोविड प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. अलीकडे लससाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने दररोज परिस्थितीचा आढावा घेऊन दैनंदिन लसीकरण मोहिमेचे नियोजन प्रशासन करीत आहे. त्याबाबतची माहिती देखील प्रसारमाध्यम आणि सामाजिक माध्यमातून सातत्याने नागरिकांपर्यंत पोहोचवली जात आहे. लससाठ्या अभावी लसीकरण मोहिमेत येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, सर्व समन्वयातून आणि नागरिकांच्या सहकार्याने त्यातून मार्ग काढला जात आहे.

या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून विनम्र आवाहन करण्यात येते की,

कोविड प्रतिबंध लस देताना दुसरी मात्रा घेणाऱ्यांना प्राधान्य असेल.

लसीकरणासाठी सर्व पात्र नागरिकांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केलेली असेल तरच लस देण्यात येईल.

ज्येष्ठ नागरिकांना व गरजुंना लसीकरणाची नोंदणी करण्यासाठी सहाय्य करावे, म्हणून वेगवेगळ्या अशासकीय संस्था, व्यक्ती यांना महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने यापूर्वीही आवाहन करण्यात आले आहे व पुन्हा आवाहन करण्यात येत आहे.

सद्यस्थितीत उपलब्ध कोविड प्रतिबंध लससाठा संपुष्टात आल्याने उद्या शुक्रवार, दिनांक ३० एप्रिल २०२१ ते रविवार, दिनांक २ मे २०२१ असे तीन दिवस मुंबईतील सर्व केंद्रांवरील लसीकरण पूर्णपणे बंद राहणार आहे. तथापि, या दरम्यान महानगरपालिकेला लससाठा प्राप्त झाला व लसीकरण सुरु होणार असेल तर त्याची माहिती प्रसारमाध्यमं व समाजमाध्यमांतून मुंबईकरांपर्यंत पोहोचविण्यात येईल.

शनिवार, दिनांक १ मे २०२१ पासून १८ वर्ष व त्यापेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांचे लसीकरण नियोजित आहे. मात्र, लससाठा उपलब्ध नसल्याने या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण देखील पुढे ढकलण्यात आले आहे. ज्या-ज्या वेळी लससाठा उपलब्ध होऊन लसीकरण पूर्ववत सुरु करण्यात येते, त्याची माहिती प्रसारमाध्यमं आणि सामाजिक माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवली जात आहे. लसीकरण पूर्ववत सुरु झाल्यानंतर ४५ वर्ष व त्यापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांचे प्राधान्याने आणि खात्रीपूर्वक लसीकरण करण्यात येईल. त्या संदर्भात कोणताही संभ्रम बाळगू नये.

१८ ते ४४ वर्ष वयोगटातील लसीकरण सुरु झाल्याने आपल्याला लस मिळणार नाही, असा गैरसमज ४५ वर्ष व त्यापेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांनी बाळगू नये. लसीकरणाची व्याप्ती वाढली तरी ४५ वर्ष व त्यावरील वयाच्या नागरिकांना प्राधान्याने लस देण्यात येईल. लससाठा उपलब्ध झाल्यानंतर, लसीकरणासाठी ४५ वर्ष व त्यापेक्षा अधिक वयोगटाच्या नागरिकांनी केंद्रांवर रांगेत उभे राहून गर्दी करु नये. गर्दी केल्याने संसर्ग फैलावण्याचा धोका वाढतो, ही बाब सर्वांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. तसेच लसीकरण केंद्रांवर येताना आणि वावरताना एकावर एक असे दोन मास्क परिधान करावेत.

कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा (डोस) घेतलेल्या नागरिकांनी देखील चिंताग्रस्त होऊ नये. प्रथम मात्रा घेतल्यानंतर शरीरात पुरेशी प्रतिपिंडे (ऍण्टीबॉडीज) निर्माण होतात. त्यामुळे काही कारणाने दुसरी मात्रा घेण्यास थोडासा विलंब झाला तरी काळजी करु नये. कोविड प्रतिबंध लससाठ्याच्या उपलब्धतेसंदर्भातील वस्तुस्थिती लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून मुंबईकरांना विनम्र आवाहन करण्यात येते की, प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करावे.

Tags:    

Similar News