कोरोना विरोधातील लढाई जिंकण्याचा दावा करणाऱ्या मोदींना सोनिया गांधींचे तिखट सवाल...

Update: 2021-04-30 07:49 GMT

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येबरोबरच रुग्णांच्या मृत्यूंची संख्या देखील वाढत आहे. अशा परिस्थिती सरकारने लोकांचा जीव वाचवण्यावर भर द्यायला पाहिजे. असं मत कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्यक्त केलं आहे. 'द हिंदू' या नामांकित वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

काय म्हटलंय सोनिया गांधी यांनी... मोदी सरकारने अगोदरच जाहीर करुन टाकलं होतं की, त्यांनी कोरोनावर विजय मिळवला आहे. त्यांनी संसदेच्या स्थायी समितीच्या सल्ल्याकडे देखील दुर्लक्ष केलं. संसदेच्या स्थायी समितीने सरकारला कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी तयार राहण्याच्या सूचना केल्या होत्या.

सुपर स्प्रेडरचे कार्यक्रम सुरु केले...

फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच देशातील, परदेशातील सरकारी आरोगतज्ज्ञांनी स्थिती बिघडू शकते. असा इशारा दिला होता. मात्र, सरकार दुसऱ्या कामात व्यस्त होती. या दरम्यान कोरोनाच्या येणाऱ्या संकटाविरोधात तयारी करण्याऐवजी कोणताही विचार न करता सुपर स्प्रेडर चे कार्यक्रम सुरु केले.

ही वेळ राजकारणाची नाही

ही वेळ राजकारणाची नाही. तर मिळून काम करण्याची आहे. पंतप्रधानांना हवं असेल तर त्यांनी क्रेडिट घ्यावं, यामध्ये काही नवीन गोष्ट नाही. मात्र, काही तरी पावलं तर उचला.

मनमोहन सिंह यांच्या पत्राला उत्तर का नाही?

गेल्या काही दिवसांपुर्वी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी आपल्या अनुभवाच्या आधारावर नरेंद्र मोदी यांना काही सूचना देणारं पत्र लिहिलं होतं. मात्र, पंतप्रधानांनी त्याला काहीही उत्तर दिलं नाही. आरोग्य मंत्र्यांनी त्याला उत्तर दिलं. मात्र, या उत्तरात त्यांनी मनमोहन सिंह यांच्यावर आणि कॉंग्रेसवर वैयक्तीक टीका केली.

18 ते 44 वयोगटाकडे सरकारचं दुर्लक्ष

मी गेल्या 14 महिन्यात कोविड-19 ला रोखण्यासाठी आवश्यक सूचना देणारी 10 पत्र लिहिली होती. मात्र, त्या कोणत्याही पत्राला समर्पक उत्तर देण्यात आलेलं नाही. 18 ते 44 वयातील लोकांकडे सरकार दुर्लक्ष करत असून त्यांच्याकडून लसीसाठी अधिकची किंमत घेण्याची इच्छा सरकार व्यक्त करत आहे.

सर्वांना मोफत लस द्या...

आमच्या पक्षाच्या मते, सर्वांना मोफत आणि लवकरात लवकर लस मिळायला हवी. यासाठी केंद्र सरकारने स्वत: जबाबदारी घ्यायला हवी. लस उत्पादक कंपन्यांशी बातचीत करायला हवी. मात्र, सरकारने असं वातावरण तयार केलं आहे की, कोरोना लसींच्या वेगवेगळ्या किंमती समोर येत आहेत. त्यामुळं या कंपन्या सध्या परिस्थितीचा फायदा घेत आहेत.

Tags:    

Similar News