कोरोना वाढला, मुंबईत कोरोनाचे नवीन नियम...

कोरोना वाढला! मुंबईत कोरोनाचे नवीन नियम, काय आहेत कोरोनाचे नवीन नियम?;

Update: 2021-02-18 15:40 GMT

मुंबई मध्ये वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी नियम मोडणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. काय आहेत हे आदेश वाचा...

गृह विलगीकरणासह लग्‍न समारंभ तसंच सार्वजनिक आयोजनांचे नियम मोडणाऱ्यांवर दाखल होणार गुन्‍हे

पाचपेक्षा अधिक रुग्‍ण आढळणाऱ्या इमारती करणार प्रतिबंधीत (सील)

होम क्‍वारंटाईन केलेल्‍या नागरिकांच्‍या हातावर मारणार शिक्‍के

विना मास्‍क रेल्‍वे प्रवास करणाऱ्यावर कारवाईसाठी नेमणार ३०० मार्शल

विना मास्‍क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईसाठी मार्शल्‍सची संख्‍या होणार दुप्‍पट, दररोज २५ हजार जणांवर कारवाईचे लक्ष्‍य

मंगल कार्यालये, क्‍लब, उपहारगृहं इत्‍यादी ठिकाणी धाडी टाकण्‍याच्‍या सूचना

ब्राझिलमधून मुंबईत येणारे प्रवासीदेखील आता संस्‍थात्‍मक विलगीकरणात

रुग्‍ण वाढत असलेल्‍या विभागांमध्‍ये तपासण्‍यांची संख्‍या वाढवणार

कोविड-१९ विषाणूचा संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात येत असतानाच मागील काही दिवसांत रुग्‍ण संख्‍या वाढत असल्‍याने संपूर्ण यंत्रणेने सतर्क राहणे गरजेचे आहे. वाढती रुग्‍ण संख्‍या पाहता घरी विलगीकरण राहणाऱ्यांच्‍या हातावर शिक्‍के मारावेत, त्‍यांनी नियम मोडला तर त्‍यांच्‍यावर गुन्‍हे दाखल करावेत. लग्‍न समारंभ आयोजनाचे नियम मोडणाऱ्या आयोजकांसह व्‍यवस्‍थापनांवरही गुन्‍हे दाखल करावेत.

मास्‍कचा उपयोग न करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्‍यासाठी उपनगरीय रेल्‍वे गाड्यांमध्‍ये ३०० मार्शल्‍स नेमावेत तसेच मुंबईतील मार्शल्‍सची संख्‍या दुप्‍पट करावी, पाचपेक्षा अधिक बाधित रुग्‍ण आढळणाऱ्या इमारती प्रतिबंधित (सील) कराव्‍यात, यासह विविध सक्‍त सूचना महानगरपालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल यांनी केल्‍या आहेत.

कोविड-१९ अर्थात कोरोना विषाणूचा धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नसून कोरोनाच्‍या नवीन विषाणूने जगातील काही देशांत हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. मुंबईसह महाराष्‍ट्रात कोविड प्रतिबंधात्‍मक लसीकरण वेगाने सुरु असतानाच मागील काही दिवसांत कोविड रुग्‍णांची संख्‍या पुन्‍हा वाढू लागल्‍याने मुख्‍यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वांना सावधगिरी बाळगण्‍याचे निर्देश दिले आहेत.

या पार्श्‍वभूमीवर बृहन्‍मुंबई महानगरपालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल यांनी आज (दिनांक १८ फेब्रुवारी २०२१) महानगरपालिकेचे सर्व अतिरिक्‍त आयुक्‍त, परिमंडळीय सहआयुक्‍त, उपआयुक्‍त, सर्व विभाग कार्यालयांचे सहायक आयुक्‍त तसेच संबंधित अधिकारी यांच्‍यासमवेत दूरदृश्‍य प्रणाली (व्हिडिओ कॉन्‍फरन्‍स) द्वारे बैठक घेतली. त्‍यावेळी आयुक्‍त चहल यांनी परिस्थितीचा आढावा घेवून यंत्रणेला आवश्‍यक ते निर्देश दिले.

यावेळी आयुक्‍त चहल म्‍हणाले की, जून-जुलै २०२० मधील स्थितीच्‍या तुलनेत आजही कोविड १९ संसर्गाची स्थिती नियंत्रणात आहे. असे असले तरी कोविडचे रुग्‍ण वाढत असल्‍याने यंत्रणेने दक्ष राहणे आवश्‍यक आहे. जनजीवन पूर्वपदावर येत असताना नागरिकांनी कोविड १९ प्रतिबंधात्‍मक निर्देशांचे पालन करणे आवश्‍यक आहे, कारण कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. नियमांचे पालन होत नसल्‍यास अधिक कठोरपणे कारवाई करुन वेळीच संसर्गाला अटकाव होणे आवश्‍यक आहे, असे सांगून आयुक्‍तांनी वेगवेगळ्या सूचना केल्‍या. त्‍या पुढीलप्रमाणेः

लक्षणे आढळत नसलेल्‍या बाधित (असिम्‍प्‍टोमॅटिक) रुग्‍णांना घरी विलगीकरण (होम क्‍वारंटाईन) करण्‍यात येते. अशा रुग्‍णांवर पूर्वीप्रमाणे हातावर शिक्‍के मारण्‍यात यावेत. तसेच त्‍यांची माहिती संबंधित सोसायटींना कळवावी. वॉर्ड वॉर रुम्‍सच्‍या माध्‍यमातून त्‍यांच्‍यावर बारकाईने नजर ठेवावी. अशा व्‍यक्तिंना दिवसातून ५ ते ६ वेळा दूरध्‍वनीवर संपर्क साधून ते घरी असल्‍याची खातरजमा करावी. बाधित व्‍यक्तिंची योग्‍य माहिती ठेवून त्‍यांच्‍या नजीकच्‍या संपर्कातील व्‍यक्तिंचे विलगीकरण करावे. असिम्‍प्‍टोमॅटिक रुग्‍णाचा घरातील विलगीकरण (होम क्वारंटाईन) कालावधी पूर्ण होण्‍याआधी रुग्ण घराबाहेर पडला, सार्वजनिक ठिकाणी फिरला तर त्‍याची माहिती सोसायट्यांनी महानगरपालिकेच्‍या वॉर्ड वॉर रुमला कळवावी. वॉर्ड वॉर रुमने अशा रुग्‍णांवर गुन्‍हे दाखल करण्‍याची कार्यवाही करावी. तसेच अशा रुग्‍णांना सक्‍तीने संस्‍थात्‍मक विलगीकरण (इन्‍स्‍ट‍िट्यूशनल क्‍वारंटाईन) करावे.

Tags:    

Similar News