जागतिक महामारी कोरोना बाबत समाजामध्ये अजूनही फार मोठ्या प्रमाणात अज्ञान असताना लाइफ सायन्स विषयाच्या तज्ञ स्थानिया भालेराव यांनी लसीकरणाबाबतचा प्रबोधन करणारा व्हिडिओ मॅक्स महाराष्ट्र वरून प्रसिद्ध केला होता. समाजातील तळागाळापर्यंत हा संदेश पोहोचतो आणि वंचित गटातील घटकातील एक प्रतिनिधी थेट लेखिकेला साद घालते.. या दुर्मिळ अनुभवाचं शब्द चित्रण केले आहे खुद्द स्वतः सानिया भालेराव यांनी..
काल संध्याकाळी एक फोन आला. नंबर अनोळखी होता पण उचलला. तर तिकडून " हॅलो मॅडम मी आशा बोलतीये आणि मी ते कोरोना इंजेक्शनसाठी नाव दिलं आणि आता परवा घेणार आहे".. असं अगदी उत्साहात पलीकडची बाई बोलत होती. मी काही म्हणणार इतक्यात त्या बोलायला सुरूच झाल्या. "तुमाला ऐकलं रेडिओवर परवाच्याला ताई. ते कोरोणा पेशल वृत्त असतं त्यात. मला त्या इंजेक्शनची लई भीती वाटायची ताई. मी राहते भांडुपला. आणि धुणी भांड्याची कामं करते म्हणून फिरत असते लई. माझं पोरगं सांगयच की घे ते इंजेक्शन पण मला लई भ्या वाटायचं. मी नाही म्हणायची. पण तुमचं भाषण का काय ते ऐकलं, आणि वाटलं की आपल्याकडे पाहिजे ते शैनिक जर कोरोणा आला तर अंगात. लढायला ताकत हवी हे पटलं मॅडम तुमचं. म्हणून दिलं बरं नाव इंजेक्शनसाठी" आणि मग पन्नाशीच्या आशा ताई पुढची दहा मिनिटं अगदी मायने बोलत राहिल्या, माझी सगळी चौकशी केली आणि भरभरून आशीर्वाद दिले. त्यांचा मुलगा अशोक तो माझे आर्टिकल्स वाचायचा आणि कोण्या एका दिवाळी अंकात माझा नंबर एकदा चुकून गेला होता तो त्याला मिळाला होता आणि मग आईला बोलायचं म्हणून त्याने फोन लावून दिला होता. अशोक ने खरं तर बी ए मराठी केलं आहे पण तो रिक्षा चालवतो. त्याच्याशी पण बोलले मग. म्हणाला मॅडम आईने केवळ तुमच्यामुळे लस घेण्यासाठी नाव दिलं आणि तिच्या इतर मैत्रणीनींना पण सांगून नाव द्यायला लावलं. आशा ताईंशी बोलून इतकं छान वाटलं. अण्णांनी पाठीवर शाबासकी दिली असं वाटून गेलं. विज्ञानावर अगदी एका जरी व्यक्तीवर विश्वास ठेवून ते आपल्या वर्तनात आणलं तर मी जे काही हे करत आहे ते सत्कारणी लागलं असं वाटतं.
मागच्या आठवड्यात जो लसीकरणासाठी व्हिडीओ केला होता तो व्हिडीओ माझ्याकडे काम करणाऱ्या स्वयंपाकाच्या मावशींना आला व्हॉट्सऍप वर. मग त्यांनी दुसऱ्या दिवशी मला दाखवला अन त्यांच्या सगळ्या मैत्रिणींना फार कौतुकाने पाठवला. त्यांचं वय कमी पडतं आहे पण वयाची अट कमी झाली की मी लगेच लस घेणार ताई असं म्हणाल्या. स्वच्छतेचं काम करणाऱ्या माझ्या दुसऱ्या मावशी प्रचंड घाबरत होत्या लसीला. जवळपास आठवडाभर त्यांना समजवून सांगितलं. शेवटी हा व्हिडीओ जेव्हा त्यांना दाखवला तेव्हा मग आता समजलं ताई असं म्हणून लसीकरणा करीत नाव नोंदवून आल्या. घरोघरी जाऊन काम करणाऱ्या या बायका, यांच्या देखील जीवाला तितकाच धोका आहे जेवढा आपल्या. कोणाकडे किती पैसा आहे हे पाहून जीवाची किंमत ठरत नसते. जीव' प्रत्येकाचा म्हत्वाचाच. मुंबई आकाशवाणीमुळे अशा कित्येक लोकांपर्यंत पोहोचता येतं आहे आणि यानिमित्ताने वैज्ञानिक माहिती देऊन आशा ताईसारखे निरागस लोक लस घेण्यासाठी प्रवृत्त होणार असतील तर हे सुद्धा माझ्यासारख्या विज्ञानावर प्रेम करणाऱ्या सामान्य माणसासाठी फार मोठी गोष्ट आहे. असंच चिगु पिंगू का होईना पण प्रामाणिक काम हातून घडत राहो. आजूबाजूला अवैज्ञानिक गढूळता पसरत असतांना, हे असे फोन, मेसेजेस मनाला फार उभारी देणारे ठरतात. आशाताई तुमच्यासारखी भरभरून आशीर्वाद देणारी पापभीरु माणसं अशीच माझ्यासोबत सदैव राहोत.
सानिया भालेराव
#Gratitude