रायगडात कोरोना काळात हजारो टन धान्याची नासाडी: वडखळ गोदामाबाहेरील हजारो टन धान्य नुकसानीचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल, प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष
संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट ओढवले आहे, राज्य व देशातही कोरोनाने कहर माजविला आहे. कुणी विषाणूंच्या संसर्गाने मरत आहे, तर कुणी पोटाला अन्न मिळत नाही म्हणून भूक बळीने मरत आहे, अशातच रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वडखळ ग्रामपंचायत हद्दीतील बोरी फाटा या ठिकाणी शासकीय धान्याच्या गोदामाबाहेरील धान्याची पोती अस्ताव्यस्त पडली असल्याचे वास्तव समोर आले आहे. या पोत्याना उंदीर, घुशीनी फोडली असून या धान्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली असून प्रशासन मात्र डोळे मिटून बसलेले आहेत.
या परिस्थितीचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक एक दाणा निर्माण करण्यासाठी जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांनी आपले घाम गाळून पिकवलेले धान्य या शासकीय गोदामाबाहेर गेली ४ महिन्यांपासून पडून असून या धान्याकडे गोदामाचा एकही अधिकारी फिरकला नसून या धन्याचे फार मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी तलाठी कार्यालय आणि मंडळ अधिकारी यांचे देखील कार्यालय शेजारी असून त्यांनी देखील डोळे मिटून घेतल्याचे दिसून आले आहे.
तरी सदरील परिस्थितीचा व्हिडियो प्रवीण म्हात्रे या जागरूक तरुणाने काढून प्रशासन शेतकऱ्यांशी कशा प्रकारे बेईमान पद्धतीने वागत आहे आणि त्यांनी कष्टाने पिकविलेल्या धान्याची कशा पद्धतीने नासाडी करत आहे त्यांच्या या बेपरवाईचे दृश्य सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजासमोर मांडले आहे. दरम्यान या प्रकरणी प्रशासनाची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी तहसीलदार अरुणा जाधव यांच्याशी संपर्क साधला असता सदरचे धान्य जिल्हा मार्केटिंग फेडरेशन च्या अखत्यारीत असून यासंदर्भात त्याना आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत असे त्यांनी सांगितले. प्रांत अधिकारी विठ्ठल इनामदार म्हणाले की सरकारी धान्य कधी उघड्यावर पडत नाही, याबाबत चौकशी केली जाईल, असे म्हटले.यासंदर्भात बोलताना जिल्हा मार्केटिंग फेडरेशन च्या अधिकाऱ्यांनी धान्य लवकरात लवकर उचलले जाईल अस म्हटलं.