Covid-19 : कोरोनाच्या साथीमुळे एका दिवसात या देशामध्ये 1,028 रुग्णांचा मृत्यू
रशियामध्ये कोरोनाने पुन्हा एकदा कहर केला आहे. कोरोनाच्या (Covid-19 Russia) साथीमुळे गेल्या 24 तासांमध्ये रशियात 1,028 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे एका दिवसात मृत्यू झालेल्या रुग्णांची ही सर्वाधिक संख्या असल्याचे बोलले जात आहे. या कोरोनासाथीला रोखण्यासाठी रशियात एका आठवड्याची सुट्टी लागू करण्याची मागणी रशियन सरकारच्या मंत्रिमंडळाने केली आहे.
रशियात आतापर्यंत एकूण 2,26,353 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा युरोपमधील कोरोना मृतांचा सर्वाधिक आकडा आहे. दरम्यान वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 30 ऑक्टोबरपासून एक आठवडा सुट्या जाहीर कराव्यात अशी सूचना उपपंतप्रधान तात्याना गोलिकोवा यांनी केली आहे. या आठवड्यात अगोदरच रशियात चार दिवस सरकारी सुट्ट्या आहेत. मात्र, या प्रस्तावाला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी अद्याप मंजुरी दिलेली नाही.
खरंतर, कोरोनाच्या डेल्टा प्रकारामुळे युरोपच्या अनेक देशांमध्ये हाहाकार उडाला आहे. युनायटेड किंग्डमसह इतर देशांत डेल्टा प्रकारामुळे रुग्णांची संख्या अचानक वाढली आहे. आता रशियातील प्रकरणांत अचानक रुग्णसंख्या वाढ होण्यामागे डेल्टा प्रकार हे कारण असल्याचे बोलले जात आहे.