कोरोना बळींचा आकडा वायु प्रदुषणामुळे वाढला?
Corona death toll rises due to air pollution?;
कोरोनामुळे जगभरात लाखो लोकांचा बळी गेला आहे. पण आता कार्डियोव्हस्क्युलर जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांपैकी १५ टक्के लोक दीर्घकाळ प्रदुषणयुक्त वातावरणात राहिल्याचे निष्पन्न झाले आहे. या अभ्यासानुसार कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांपैकी युरोपमधील १९ टक्के, उत्तर अमेरिकेतील १७ टक्के आणि पूर्व आशियामध्ये झालेल्या मृत्यूंपैकी २७ टक्के मृत व्यक्तींचा संबंध वायू प्रदुषणाशी आहे. जर्मनीमधील मॅक्स प्लांक रसायन विज्ञान संस्थेमधील संशोधकांचा या संशोधनामध्ये सहभाग होता.
जगभरातील विविध देशांमध्ये यासंदर्भातले संशोधन करुन हा अहवाल तयार करण्यात आला आहे. कोरोनामुळे जेवढे मृत्यू झाले आहेत त्यापैकी वायू प्रदुषणामुळे झालेल्या मृत्यूंबाबत अभ्यास करुन वायू प्रदुषणाचा जगाला किती धोका निर्माण झाला आहे याचा आढावा यामध्ये घेण्यात आला आहे.
संशोधकांच्या मते हा निष्कर्ष काढताना वायू प्रदूषण आणि कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये संबंध नसला तरी वायू प्रदुषणामुळे गंभीर आजार आणि आरोग्याला असलेल्या धोक्यांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध असल्याचे सिद्ध झाले आहे. या संशोधनात कोव्हीड – १९ संदर्भात अमेरिका आणि चीनमध्ये याआधी झालेल्या संशोधनाची मदत झाली आहे. २००३मध्ये आलेल्या सार्सच्या साथीशी संबंधित आकडेवाराचाही वापर यामध्ये करण्यात आला आहे. पीएम २.५ सारख्या अतिसूक्ष्म कणांचे ज्या ठिकाणी हवेत अस्तित्व असते तिथे जास्त काळ राहण्यासंदर्भातील एका मॉडेलचे विश्लेषण या अहवालात करण्यात आले आहे..
कोरोना महामारीबाबत जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंतच्या आकड्यांचा उपयोग या अभ्यासासाठी संशोधकांनी केला आहे. पण कोरोनाचे संकट संपल्यानंतर यासंदर्भात व्यापक अभ्यासाची आणि विश्लेषणाची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार संशोधकांनी विविध देशांमध्ये केलेल्या अभ्यासानुसार चेक प्रजासत्ताकमध्ये २९ टक्के, चीनमध्ये २७ टक्के, जर्मनीमध्ये २६ टक्के, स्वित्झर्लंमध्ये २२ टक्के आणि बेल्जियममध्ये २१ टक्के प्रदुषण आहे.
मॅक्स प्लांक इन्स्टिट्यूच्या प्रा. जोस लेलिवेल्ड यांच्या म्हणण्यानुसार, कोव्हीड १९ नुसार होणाऱ्या मृतांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रत्येक देशात किती रुग्णांचा मृत्यू झाला याची अंतिम संख्या काढणे कठीण आहे. त्यांनी एक उदाहरण दिले आहे की "ब्रिटनमध्ये कोरोनामुळे ४४ हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. आमच्या अंदाजानुसार यापैकी १४ टक्के मृत्यूंना वायू प्रदुषण जबाबदार आहे. म्हणजेच ६,१०० पेक्षा जास्त मृत्यूंचे कारण वायू प्रदुषण आहे."
त्यांच्या म्हणण्यानुसार "अमेरिकेत कोरोनामुळे २ लाख २० हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी जवळपास ४० हजार मृत्यू हे वायूप्रदुषणामुळे झालेले आहेत."
जर्मनीतील जोहान्स गटेनबर्ग विद्यापीठातील प्रा. थॉमस मुन्जेल यांच्या मते, "जे लोक वायू प्रदूषण असलेल्या परिसरात राहतात. त्यांच्या फुफ्फुसांमध्ये आणि रक्तवाहिन्यांमध्ये खूप छोटे प्रदुषणकारी पीएम २.५ कण प्रवेश करतात. ज्यामुळे फुफ्फुसांना सूज येते आणि गंभीर ऑक्सिडेटीव्ह ताणही येतो. त्यामुळे शरारीतील लाल पेशी आणि ऑक्सिडेंट कणांमधील संतुलन बिघडून दुष्परिणाम होतात.
त्यांच्या मते "यामुळे धमण्यांना अंतर्गत इजा होते आणि एंडोथेलियमलाही नुकसान होते. त्यामुळे धमन्या आकुंचन पावतात किंवा वाकतात. कोरोना व्हायरसही फुफ्फुसांच्या माध्यमातून शरिरात प्रवेश करतो. त्यामुळे रक्तवाहिन्यांना इजा होते. कोरोनाबाधीत व्यक्ती जर वायू प्रदुषण असलेल्या परिसरात आली तर त्या व्यक्तीच्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो. विशेषत: याचा परिणाम ह्रदय आणि रक्तवाहिन्यांवर होऊन कोरोनाचा धोका अधिक वाढू शकतो."