धक्कादायक ..! गुजरात भाजपच्या अधिकृत ट्वीटरवरून वादग्रस्त व्यंगचित्र

अहमदाबाद बाँबस्फोटातील आरोपींना फाशीची शिक्षा झाल्यानंतर गुजरात भाजपच्या ट्वीटरवरून धार्मिक तेढ निर्माण करणारे ट्वीट;

Update: 2022-02-21 02:22 GMT

गेल्या काही दिवसांमधील घटनांमुळे देशातील धार्मिक वातावरण दुषित होत असतानाच गुजरात भाजपच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून एक वादग्रस्त व्यंगचित्र ट्वीट करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

26 जुलै 2008 रोजी झालेल्या अहमदाबाद साखळी बाँबस्फोटातील 77 आरोपींपैकी 38 आरोपींना फाशीची शिक्षा झाली. तर 11 आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा विशेष न्यायालयाने सुनावली. मात्र यानंतर भाजपच्या अधिकृत ट्वीटर हॅडलवरून एक वादग्रस्त व्यंगचित्र ट्वीट करण्यात आले आहे.


 



गुजरात भाजपच्या ट्वीटर हँडलवरून केलेल्या ट्वीटमध्ये एका व्यंगचित्रात फाशीच्या दोरखंडाला काही मुस्लिम धर्माची टोपी घातलेल्या व्यक्तींना लटकवल्याचे दाखवण्यात आले आहे. तसेच यामध्ये शेजारी सत्यमेव जयते, दहशतवाद पसरवणारांना क्षमा नाही, असे लिहीले आहे. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

गुजरात भाजपच्या ट्वीटर हँडलवर प्रसिध्द केलेल्या ट्वीटवर काँग्रेसने सडकून टीका केली आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा भाजप राजकीय लाभ उठवत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तर दहशतवादाला कोणताही धर्म नसतो, असे मत काँग्रेस प्रवक्ते मनिष दोशी यांनी म्हटले आहे.



गुजरात भाजपच्या ट्वीटर हँडलवरून वादग्रस्त व्यंगचित्र प्रसिध्द करण्यात आल्यानंतर त्यावरून वाद निर्माण झाला. त्यामुळे ते व्यंगचित्र भाजपने आपल्या ट्वीटर हँडलवरून हटवले असल्याची माहिती गुजरात भाजपचे माध्यम विभाग निमंत्रक योगेश दवे यांनी सांगितले. तसेच या व्यंगचित्रातून इतर कोणत्याही धर्मियांवर टीका करण्याचा हेतू नव्हता, असे स्पष्टीकरण योगेश दवे यांनी दिले.

मात्र भाजपने व्यंगचित्र ट्वीटर हँडलवरून डिलीट केले असले तरी ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दुषित झालेल्या धार्मिक वातावरणाला हे ट्वीट आणखी दुषित करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Tags:    

Similar News